Join us  

Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 3:54 PM

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी हा या वर्षातील बहुप्रतीक्षित आयपीओ आहे. स्विगीच्या आयपीओबाबत बाजारात जोरदार चर्चा सुरू आहेत.

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी हा या वर्षातील बहुप्रतीक्षित आयपीओ आहे. स्विगीच्या आयपीओबाबत बाजारात जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान, बाजार नियामक सेबीकडूनही आयपीओला हिरवा कंदील मिळालाय. आता हा आयपीओ नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आलीये. याआधी दिग्गज सेलिब्रिटींमध्ये या कंपनीच्या शेअरची जबरदस्त क्रेझ आहे. क्रिकेटपासून सिनेसृष्टीपर्यंत स्विगीचे शेअर्स विकत घेण्याची स्पर्धा सुरू आहे. राहुल द्रविडपासून अमिताभ बच्चन आणि चित्रपट निर्माते करण जोहरपर्यंत अनेकांनी स्विगीच्या प्री-आयपीओमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर येतेय.

सेलिब्रिटींकडून मोठी गुंतवणूक

इकॉनॉमिक टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, स्विगीच्या प्री आयपीओ शेअर्सचा अनलिस्टेड मार्केटमध्ये सक्रिय व्यवहार करण्यात आला. यामध्ये जवळपास २,००,००० शेअर्स सेलिब्रिटींनी खरेदी केले होते. रिपोर्टनुसार, स्विगीच्या प्री-आयपीओ शेअर्समध्ये क्रीडा आणि मनोरंजन उद्योगातील दिग्गजांनी अधिक रस घेतला आहे. या गुंतवणूकदारांमध्ये क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि झहीर खान, टेनिसस्टार रोहन बोपण्णा, करण जोहर आणि अभिनेता-उद्योजक आशिष चौधरी यांचाही समावेश आहे.

यांचीही गुंतवणूक

स्विगीच्या आयपीओपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि झहीर खान, बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने, टेनिस स्टार रोहन बोपण्णा, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर, अभिनेता आणि उद्योजक आशिष चौधरी यांचा समावेश आहे. याशिवाय इनोव्ह ८ चे संस्थापक रितेश मलिक यांनीही स्विगीच्या प्री-आयपीओमध्ये गुंतवणूक केली आहे. 

आयपीओची योजना आखण्यापूर्वीच स्विगीने सॉफ्टबँक व्हिजन फंड, एक्सेल आणि प्रोसस सारख्या जागतिक व्हेंचर कॅपिटल कंपन्यांकडून स्वतंत्र फंडिंग राऊंड्सद्वारे निधी गोळा केला होता. सेकंडरी मार्केटच्या माध्यमातूनही कंपनीनं निधी उभा केला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चेअरमन रामदेव अग्रवाल यांनीही स्विगीमध्ये गुंतवणूक केली आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्विगीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार