शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात गुरुवारी तेजीसह झाली आणि पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स ३३६ अंकांच्या वाढीसह ८०३२३ वर उघडला, तर निफ्टी ८३ अंकांच्या वाढीसह २४३७० वर उघडला. आयटी क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये सुरुवातीची तेजी दिसून येत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये सुरुवातीच्या कामकाजात २.४२ टक्क्यांची तेजी दिसून आली. तर हिंडाल्को, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टीसीएस या कंपन्यांचे शेअर्सही वधारले. मार्केट उघडताच आयटी आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
एचडीएफसी बँक, सिप्ला, श्रीराम फायनान्स, डॉक्टर रेड्डीज, एचयूएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून येत आहे. एचडीएफसी बँकेने बुधवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला होता. कंपनीचा शेअर १७९४ वर प्रस्थापित केला. त्यानंतर गुरुवारी या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आलं.
मजबूत जागतिक ट्रेंडच्या जोरावर देशांतर्गत बाजारांनी बुधवारीही नवी उंची गाठली. बेंचमार्क निफ्टीनं २४३०० चा टप्पा ओलांडला, तर सेन्सेक्सने ऐतिहासिक ८०,००० चा टप्पा ओलांडला. गुरुवारी बाजारात आणखी एक गॅप ओपनिंग झाली आणि बाजारात तेजी कायम राहिली.