अदानी समूहाच्या तीन कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवलाय. मंगळवारी बीएसईवर अदानी ट्रान्समिशन (रु. 1,013.55), अदानी टोटल गॅस (रु. 935.35) आणि अदानी ग्रीन एनर्जीला (रु. 930.75) अप्पर सर्किट लागलं होतं. समूहातील प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी विल्मर, एनडीटीव्ही, एसीसी, अंबुजा सिमेंट्स आणि अदानी पोर्ट्स अँज स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअर्सच्या किंमतीत 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
खरं तर, सोमवारी अदानी समूहानं बायबॅकचा कार्यक्रम सुरू केल्याचं सांगितलं. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल या वर्षी जानेवारीमध्ये समोर आल्यानंतर अदानी समूहानं पहिल्यांदाच कर्जाच्या बायबॅकची सुरुवात केली. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, APSEZ नं जुलै 2024 च्या बॉन्डच्या 13 कोटी डॉलर्सपर्यंतच्या बायबॅकसाठी निविदा मागवल्या आहेत. कंपनी पुढील चार तिमाहीत समान रक्कम बायबॅक करेल. आपली मजबूत रोख स्थिती सिद्ध करून गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी समूह हे पाऊल उचलत आहे.
24 जानेवारीला रिपोर्ट
24 जानेवारीला हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात समूहाच्या खात्यांमध्ये घोटाळा आणि शेअर्सच्या किमतीत हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, त्यांनी 2024 मध्ये मॅच्युअर होणाऱ्या 3.375 टक्के मूल्याच्या रोख्यांसाठी बायबॅक कार्यक्रम सुरू केला असल्याची माहिती एपीएसईझेकडून देण्यात आली.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)