भारताचे आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रूपनं टाटा ग्रूपला मागे टाकत देशातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेला ग्रूप बनला आहे. गौतम अदानी यांच्या ग्रूपच्या कंपन्यांचं बीएसईवरील एकूण बाजारमूल्य २२ लाख कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. अदानी ग्रूप अंतर्गत कंपन्यांचं हे देशातील सर्वाधिक बाजारमूल्य ठरलं आहे. अदानी समूहाच्या सर्व BSE सूचिबद्ध शेअर्सचे बाजारमूल्य एकत्रितरित्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा अधिक आहे.
अदानींनी नुकत्याच विकत घेतलेल्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लि.सह एकूण नऊ कंपन्यांचे बाजारमूल्यांकन टाटा समूहाच्या 27 कंपन्यांपेक्षा अधिक आहे. दुसरीकडे, मुकेश अंबानी यांचा नऊ कंपन्यांचा समूह 17 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवलासह तिसऱ्या स्थानावर आहे.
अदानी स्टॉकमधील व्यापक पातळीवर तेजी पाहायला मिळत आहे. यामुळेच गौतम अदानी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना गौतम अदानी यांनी मागे टाकले आहे. अदानींनी सध्या 154.7 अब्ज डॉलरच्या निव्वळ मूल्यमापनासह सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत लुई विटनच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकलं आहे.
दुसरीकडे, शुक्रवारी देशांतर्गत स्टॉकमधील पडझटीमुळे फोर्ब्सनं संकलित केलेल्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत अदानी पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहेत. महागाईच्या वाढत्या दरामुळे अमेरिकेत व्याज दर वाढीचे संकेत आहेत आणि याचे परिणाम अमेरिकन अब्जाधीशांच्या संपत्तीत घट होण्यावरही झाले आहेत. तरीही, इलॉन मस्क अजूनही 273.5 अब्ज डॉलर संपत्तीसह सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.