Join us  

गौतम अदानींना 'अच्छे दिन'; कंपन्यांचं मार्केट कॅप ११ लाख कोटींनी वाढलं, का होतेय गुंतवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 11:20 AM

अदानी समूहाच्या शेअर्सवर हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम आता नाहीत जमा आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सवर (Adani Group Shares) हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम आता नाहीत जमा आहे. जोरदार खरेदीमुळे अदानी समूहाचं एकूण मार्केट कॅप (Adani Group Market Cap) शुक्रवारी ११ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं. अदानी समूहाचे शेअर्समध्ये जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सातत्याने खरेदी दिसून येत आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांनी आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या मार्केट कॅपमध्ये ७,०३९ कोटी रुपयांची भर घातली. यासह, समूहाच्या १० लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ११.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात अदानी समूहाच्या शेअर्सची विक्री केली होती. अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. त्यानंतर मार्च २०२३ पासून कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा वाढ दिसून आली. तेव्हापासून अदानी समूहाने आपल्या मार्केट कॅपमध्ये सुमारे ५ लाख कोटी रुपयांची भर घातली आहे.

इन्फ्रा, पॉवर व्यवसायाचा विकासअदानींच्या शेअर्समधील वाढ ही त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर व्यवसायात समूहाची सतत होणारी वाढ, धोरणांवर केंद्रित लक्ष, निधी उभारणी आणि एनर्जीची सतत वाढणारी मागणी यामुळे आहे. “गुंतवणूकदार अदानी समूहाच्या वैविध्यपूर्ण व्यवसाय मॉडेलचे मूल्य ओळखत आहेत. समूहाने निधी उभारणीचे प्रयत्न आणि प्रकल्पांची अंमलबजावणी दुप्पट केली आहे. आगामी काळात वीज ही मोठी समस्या बनू शकते. कारण देशात ऊर्जेची मागणी वाढत आहे. हा ट्रेंड येत्या काही महिन्यांत अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये खरेदीच्या भावनेत बदलू शकतो," अशी प्रतिक्रिया एका परिचित ब्रोकरेज फर्मच्या विश्लेषकानं दिली.

शेअर्सची कामगिरीशुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ०.४७ टक्के, अदानी पोर्ट्स १.९२ टक्के, अदानी पॉवर २.९३ टक्के, अदानी ग्रीन ०.०६ टक्के, एनडीटीव्ही ०.४५ टक्के आणि अदानी विल्मर ०.४२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. त्याच वेळी ACC चे शेअर्स ०.८२ टक्के, अंबुजा सिमेंट ०.०८ टक्के, अदानी एनर्जी ०.६५ टक्के आणि अदानी टोटल ०.३२ टक्क्यांनी घसरले.(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीशेअर बाजार