आजही बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणावर व्यवहार करत आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवालानंतर, अदानी समूहाचे शेअर्स मोठी प्रमाणावर घसरले होते. अदानी ग्रुपचे (गौतम अदानी) अनेक शेअर्स त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर गेले होते. मात्र आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळत आहे.
शेअर्सच्या किंमतींबरोबरच गौतम अदानी यांच्या नेट वर्थमध्येही मोठी वाढ झाली आहे. सध्या श्रीमंतांच्या यादीत अदानी 21 व्या क्रमांकावर आहे. जर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये याच पद्धतीने तेजी राहिली तर, अदानी लवकरच जगातील टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीत सामील होतील. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स 80 टक्क्यांहून अधिक घसरले होते. गेल्या काही दिवसांपासून अदानींच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
या शेअर्समध्ये दिसतेय तेजी -
अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स आज हिरव्या निशाणावर आहेत. अदानी समूहातील फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेज (Adani Enterprises) चा शेअर आज 1,834 रुपयांवर खुला झाला. शेअरमध्ये 11 अंकांची तेजी आली असून या शेअरने 1,850 रुपयांच्या उच्च पातळीलाही स्पर्ष केला आहे. तसेच, अदानी विल्मार लिमिटेडचा शेअर 420.75 रुपयांवर खुला झाला होता. सध्या तो वाढून 424 रुपयांवर व्यवहार करत आहे.
याशिवाय, अदानी ट्रान्समिशनचा शेअर 20 अंकांच्या वाढीसह 1,026.10 वर व्यवहार करत आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह अपर सर्किटवर आहे. हा शेअर 935.60 वर ट्रेड करत आहे. अदानी टोटल गँसच्या शअरमध्ये आज चांगली तेजी दिसत आहे. हा शेअर चार टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 934.75 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्येही तेजी दिसून येत आहे. हा शेअर तेजीसह 667.85 रुपयांवर व्यवहार करत आहे. एसीसी आणि एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही तेजी दिसून येत आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)