Join us

Adani Power Acquire Lanko Amarkantak : अदानींची 'पॉवर' वाढली, ४१०० कोटी रुपयांची डील आणि झोळीत आली आणखी एक वीज कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:10 AM

Adani Power Acquire Lanko Amarkantak : वीज क्षेत्रात गौतम अदानी यांचं स्थान आणखी भक्कम होणार आहे. वास्तविक, अदानी समूह पुन्हा एकदा खरेदीच्या मूडमध्ये आहे. अदानी समूह आता आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत असून त्यासाठी अदानी समूहाने ४१०० कोटी रुपये उभारलेत.

Adani Power Acquire Lanko Amarkantak : वीज क्षेत्रात गौतम अदानी यांचं स्थान आणखी भक्कम होणार आहे. वास्तविक, अदानी समूह पुन्हा एकदा खरेदीच्या मूडमध्ये आहे. अदानी समूह आता आणखी एक कंपनी विकत घेण्याच्या तयारीत असून त्यासाठी अदानी समूहाने ४१०० कोटी रुपये उभारलेत. वीज कंपनी लॅन्को अमरकंटक सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असून, आता एनसीएलटीने ती खरेदी करण्यासाठी अदानी समूहाला हिरवा कंदील दाखवलाय. अदानी समूह हा करार ४ हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीत करणार आहे.

एनसीएलटीची मंजुरी

अदानी समूहाची वीज कंपनी अदानी पॉवरनं एनसीएलटीकडून मंजुरी मिळाल्याची माहिती शेअर बाजाराला दिली. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) हैदराबाद खंडपीठानं लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेडला दिवाळखोरी निवारण प्रक्रियेअंतर्गत ती खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. ही वीज कंपनी विकत घेण्यासाठी अदानी समूहानं ३६५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, अदानी समूहानं कंपनी विकत घेण्यासाठी आणखी एक ऑफर दिली आहे. लॅन्को अमरकंटकवर प्रचंड कर्ज आहे, ज्याची परतफेड करण्यासाठी कंपनी आपला हिस्सा विकत आहे.

अदानी समूहाची मोठी बोली

लॅन्को अमरकंटकवर १५,६३३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती खरेदी करण्यासाठी अदानी समूहानं चार हजार कोटी रुपयांहून अधिक बोली लावली आहे. यापूर्वी अदानी समूहानं नोव्हेंबर २०२३ मध्ये लॅन्को अमरकंटकसाठी ३,६५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यानंतर समूहानं आपल्या ऑफरमध्ये सुधारणा करत डिसेंबरमध्ये ४,१०० कोटी रुपयांची अंतिम ऑफर दिली.

जिंदाल आऊट, अदानी इन

लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी पॉवरला नवीन जिंदाल यांची कंपनी जिंदाल पॉवरकडून कडवी टक्कर मिळत होती. जिंदाल पॉवरनंही आपल्या योजनेत अदानींपेक्षा मोठी बोली लावली होती. जिंदाल यांची ही ऑफर ४,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती, परंतु नवीन जिंदाल यांची कंपनी या वर्षी जानेवारीमध्ये अचानक लॅन्को अमरकंटक विकत घेण्याच्या शर्यतीतून बाहेर पडली आणि अदानी पॉवरचा मार्ग मोकळा झाला.

लॅन्को अमरकंटक का आहे खास?

अदानी आणि जिंदाल यांच्याव्यतिरिक्त मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमही लॅन्को अमरकंटक विकत घेण्याच्या विचारात होता. लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड ही आर्थिक अडचणींशी झगडणारी वीज कंपनी आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर अदानी पॉवरची क्षमता वाढून १५,८५० मेगावॅट होणार आहे. छत्तीसगडमध्ये लॅन्को अमरकंटकचा ६०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे. हरयाणा आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांशीही कंपनीचे वीज खरेदी करार आहेत.

टॅग्स :गौतम अदानीवीज