Gensol Engineering shares: जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये गुरुवारीही घसरण कायम राहिली. कंपनीमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग अकराव्या दिवशी यात ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. गुरुवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी ९५.८० रुपयांवर पोहोचला. पहिल्यांदाच कंपनीचा शेअर १०० रुपयांच्या खाली घसरले. शेअर्सच्या या घसरणीमागे सेबीची कारवाई कारणीभूत आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ९० टक्क्यांनी घसरलाय.
सेबीनं गेल्या आठवड्यात मंगळवारी आपल्या अंतरिम आदेशाद्वारे अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी या बंधूंना पुढील सूचना मिळेपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली होती. सार्वजनिकरित्या लिस्टेड कंपनी जेनसोल इंजिनीअरिंगकडून कर्जाचे पैसे वैयक्तिक वापरासाठी वळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसंच कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक गैरवर्तणुकीबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना ही कारवाई करण्यात आली.
९२ टक्क्यांपर्यंत घसरला शेअर
हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १,१२५.७५ रुपयांवरून ९१.४९ टक्क्यांनी घसरला आहे. गुरुवारपासून तब्बल ११ दिवस हा शेअर घसरत आहे. जेनसोल इंजिनीअरिंग सोलार कन्सल्टींग सेवा, इंजिनीअरिंग, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) सेवा आणि इलेक्ट्रिक वाहनं भाडेतत्त्वावर देण्यामध्ये कार्यरत आहे. जून २०२४ मध्ये सेबीला जेनसोलकडून शेअरच्या किमतीत फेरफार आणि निधीचा गैरवापर केल्याची तक्रार प्राप्त झाली आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. शिवाय, सेबीनं जेनसोल इंजिनीअरिंगला शेअर्स स्प्लिट थांबविण्याचेही निर्देश दिलेत. जेनसोल प्रकरणात सेबीनं कंपनीविरोधात दिलेल्या आदेशाची तपासणी केल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं सोमवारी स्पष्ट केलं.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)