गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात बंपर परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे, जेनसोल इंजिनिअरिंग (Gensol Engineering). गेल्या केवळ 4 वर्षातच या कंपनीचा शेअर तब्बल 5200 टक्क्यांनी वधारला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा पैसा अवघ्या 4 वर्षांतच 5 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.
केवळ 6 महिन्यांत पैसा जवळपास डबल - या मल्टीबॅगर स्टॉकच्या किमतीत आजही वाढ दिसून आली. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत 32 टक्क्यांनी वधारली आहे. तर, गेल्या 6 महिन्यांपासून या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 91 टक्के एवढा नफा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, बाजार बंद होताना कंपनीच्या एका शेअरची किंमत BSE वर 1110.10 रुपये एवढी होती.
कुणाकडे किती वाटा? - कंपनीच्या शेअर होल्डिंग्सनुसार, कंपनीमध्ये प्रमोटर्सचा वाटा 62.59 टक्के एवढा आहे. तर, 37.41 टक्के वाटा जनतेचा आहे. डिसेंबर 2023 च्या शेअर होल्डिंग्सनुसार दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांच्याकडे 1.51 टक्के हिस्सेदारी आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा EBITDA 312 टक्क्यांनी वाढून 70 कोटींवर पोहोचला होता.
कंपनीसंदर्भात थोडक्यात माहिती - Gensol Engineering ही एक इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन सर्व्हिसेस देणारी कंपनी आहे. ही कंपनी सोलर पॉवर प्लांट तयार करते. हिची स्थापना 2012 मध्ये झाली होती. या कंपनीत सध्या 240 कर्मचारी आहेत. महत्वाचे म्हणजे, या कंपनीने पुण्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा प्लांटदेखील सेट केला आहे. येथे तीन चाकी आणि चार चाकी वाहने तयार केली जातील.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)