Gensol Engineering share: जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये सातत्यानं मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कंपनीचे शेअर आज आठव्या दिवशी लोअर सर्किटवर आले. यासह हा शेअर इंट्राडे नीचांकी पातळीवर १११.६५ रुपयांवर घसरला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या घसरणीमागे सतत समोर येत असलेलं नकारात्मक वृत्त आहे. भारतीय बाजार नियामक सेबीनं (SEBI) गेल्या आठवड्यात मंगळवारी दिलेल्या अंतरिम आदेशात अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी या बंधूंना पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये एन्ट्री करण्यास मनाई केली होती.
अधिक माहिती काय?
सार्वजनिकरित्या लिस्टेड कंपनी जेनसोल इंजिनीअरिंगकडून कर्जाचे पैसे वैयक्तिक वापरासाठी वळवल्याचा आरोप होत असताना, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक गैरव्यवहाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच ही कारवाई करण्यात आली आहे. नुकतंच सेबीने जेनसोल इंजिनीअरिंगला शेअर्स स्प्लिटची योजना पुढे ढकलण्याचे निर्देश दिलेत. जून २०२४ मध्ये सेबीला जेनसोलकडून शेअरच्या किंमतीत फेरफार आणि निधीचा अपहार केल्याची तक्रार मिळाली होती आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) एका अधिकाऱ्याने पुण्यातील जेनसोल इंजिनीअरिंगच्या इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) प्रकल्पाला भेट दिली, तेव्हा तिथे कोणतंही उत्पादन कार्य आढळले नाही आणि तेथे केवळ दोन-तीन कामगार उपस्थित होते, असं सेबीनं रविवारी दिलेल्या एका अहवालात म्हटलं. जून, २०२४ मध्ये जेनसोलच्या शेअरच्या किमतीत फेरफार आणि निधीचा गैरवापर केल्याच्या तक्रारीनंतर बाजार नियामक सेबीने १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशाचा हा एक भाग होता.
अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी या बंधूंच्या जेनसोल इंजिनीअरिंग या कंपनीनं गुंतवणूकदारांना विसंगती तसंच दिशाभूल करणारे खुलासे केल्याचं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय. एनएसईनं केलेल्या तपासणीत पुण्यातील चाकण येथील जेनसोलच्या ईव्ही प्लांट - जेनसोल इलेक्ट्रिक व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेडमधील उत्पादनातील त्रुटींची माहिती समोर आली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)