Join us  

१० दिवसांत तिसरी ऑर्डर, ५५ लाख स्मार्ट मीटर्स बनवणार; 'या' छोट्या कंपनीचे शेअर्स ऑल टाईम हायवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 1:40 PM

गुरुवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ४६६.२५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एका घोषणेनंतर झाली. पाहा कोणती आहे कंपनी आणि किती आहे ऑर्डर बुक.

स्मॉलकॅप कंपनी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सनं गुरुवारी नवा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ४६६.२५ रुपयांवर पोहोचला. जीनस पॉवरच्या शेअर्समध्ये ही वाढ एका घोषणेनंतर झाली. कंपनीनं आपल्या युनिटला ४४६९ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्याचं जाहीर केलं. गेल्या दहा दिवसांत जीनस पॉवरला मिळालेली ही तिसरी ऑर्डर आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

कंपनीच्या पूर्ण मालकीच्या युनिटला ४४६९ कोटी रुपयांचे लेटर ऑफ अवॉर्ड मिळालं आहे. ही ऑर्डर डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर (DT) मीटरसह सुमारे ५.५९ मिलियन (५५.९ लाख) स्मार्ट प्रीपेड मीटरचे डिझाइन, सप्लाय, कमिशनिंग, इन्स्टॉलेशन आणि व्यवस्थापनासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. तसंच अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या अपॉईंटमेंटचाही यात समावेश असल्याची माहिती जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरनं दिली. अलीकडच्या आठवड्यात कंपनीला ११००३.०८ कोटी रुपयांचे तीन मोठे कंत्राट मिळाले आहे. कंपनीचे एकूण ऑर्डर बुक आता ३२,५०० कोटी रुपये झालीये.

५ वर्षांत २१०० टक्क्यांची वाढ

जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये गेल्या ५ वर्षांत २१०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३० ऑगस्ट २०१९ रोजी कंपनीचा शेअर २०.८० रुपयांवर होता. जीनस पॉवरचा शेअर २९ ऑगस्ट २०२४ रोजी ४६६.२५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ७००% वाढ झाली. २७ ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीचा शेअर ५८.०५ रुपयांवर होता. जीनस पॉवरचा शेअर २९ ऑगस्ट २०२४ रोजी ४६६.२५ रुपयांवर पोहोचलाय. गेल्या वर्षभरात जीनस पॉवरचे शेअर्स ८० टक्क्यांनी वधारले आहेत.

कंपनीचा व्यवसाय

जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिसिटी मीटरिंग सोल्यूशन्स प्रदान करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. त्यांचा बाजारातील वाटा सुमारे २७ टक्के आहे. अनेक प्रकारच्या मीटरमध्ये ही कंपनी आघाडीवर आहे. कंपनीनं अॅडव्हान्स्ड स्मार्ट मीटरिंग सोल्यूशन्स विकसित केले आहेत.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक