NR Narayana Murthy News: काही दिवसांपूर्वी ७० तास काम करण्याच्या केलेल्या वक्तव्यानंतर दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापन एन आर नारायण मूर्ती हे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. "देशातील गरीबी ही मोफतच्या वस्तू वाटून नाही तर, इनोव्हेटिव्ह एटरप्रेन्योर्सच्या जॉब क्रिएशनमुळे संपेल," असं नारायण मूर्ती म्हणाले. टायकॉन मुंबई-२०२५ या कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. या कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती यांनी उद्योजकांना अधिकाधिक कंपन्या आणि व्यवसाय उभारणीवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं तसंच, जर आपण नावीन्यपूर्ण उद्योग निर्माण करू शकलो तर गरिबी सकाळच्या ऊन्हातील दवाप्रमाणे गायब होऊन जाईल, असं ते म्हणाले.
"तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती शेकडो, हजारो रोजगार तयार करतील आणि तुम्ही गरिबीची समस्या सोडवाल यावर मला शंका नाही. मोफत वस्तू देऊन तुम्ही गरिबीची समस्या सोडवू शकत नाही. कोणताही देश यात यशस्वी झालेला नाही," असं नारायण मूर्ती म्हणाले.
इन्फोसिसच्या सहसंस्थापकांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा देशात वस्तू मोफत देण्यावरून आणि त्यांच्या किंमतींवरून चर्चा सुरू आहे. दरम्यान,नंतर मूर्ती यांनी, त्यांना राजकारण किंवा प्रशासनाबद्दल फारशी माहिती नाही, परंतु धोरणात्मक चौकटीच्या दृष्टीकोनातून त्यांनी काही शिफारशी केल्या असल्याचं म्हटलं.
२०० युनिट फ्री वीजेवर वक्तव्य
फायद्याच्या बदल्यात परिस्थितीतील सुधारणांचंही मूल्यमापन व्हायला हवं, असं मूर्ती म्हणाले. दरमहा २०० युनिट मोफत विजेचं उदाहरण देत, मुलं अधिक शिकत आहेत की नाही हे शोधण्यासाठी राज्यं सहा महिन्यांनंतर अशा घरांमध्ये सर्वेक्षण करू शकतात, असं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी एआयवरही वक्तव्य केलं. हल्ली विकले जाणारे बहुतेक एआय सोल्यूशन्स जुने प्रोग्राम आहेत, ज्यांना भविष्यात कामाच्या रुपात प्रोत्साहित केलं जातं. एआयमध्ये मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग क्षमतांचा समावेश आहे.