Infosys Share Dividend : दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसनं (Infosys) दिवाळीपूर्वी आपल्या शेअरहोल्डर्सना मोठी भेट दिली आहे. कंपनी आपल्या भागधारकांना मोठा लाभांश देणार असून, त्यासाठी उद्या म्हणजेच मंगळवार ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलीये. अशा परिस्थितीत लाभांशाचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करण्याची आज अखेरची संधी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीनं १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांशाला मंजुरी दिली होती. गेल्या वर्षभरात इन्फोसिसनं आपल्या भागधारकांना प्रति शेअर २८ रुपये लाभांश वितरित केला आहे. तर, १,८६६ रुपयांच्या शेअरच्या किंमतीवर त्यांचं डिव्हिडंड यील्ड १.५०% आहे.
१६ आणि १७ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत प्रति इक्विटी शेअर २१ रुपयांचा अंतरिम लाभांश घोषित करण्यात आला आहे. यासाठी २९ ऑक्टोबर रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. डिविडंट ८ नोव्हेंबर रोजी दिला जाईल, असं बैठकीनंतर कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं होतं.
तिमाही निकाल कसे?
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ५ टक्क्यांनी वाढून ६,५०६ कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत तो ६,२१२ कोटी रुपये होता. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या महसुली मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करून ३.७५ ते ४.५ टक्के केलं आहे. एक्सपेंडिचरसाठीच्या रेव्हेन्यू गाइडंसमध्ये झालेली वाढ ही मेगा डील्समधील तेजीमुळे झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)