Join us  

RVNL, IRFC सह रेल्वे कंपन्यांसाठी आनंदाची बातमी, २४ हजार कोटी खर्च करण्याची घोषणा; शेअरला बूस्ट मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 1:11 PM

Railway News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

Railway News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल, असं सरकारनं म्हटलंय. रेल्वेबाबतच्या या घोषणेचा फायदा आगामी काळात रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सोमवारी शेअर्सवर काय परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे.

२०३०-३१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित

या प्रकल्पांची अंदाजित किंमत २४ हजार ६५७ कोटी रुपये आहे. हे प्रकल्प २०३०-२०३१ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. या ८ प्रकल्पांमध्ये ७ राज्यातील १४ जिल्ह्यांचा समावेश असेल. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या प्रकल्पांमुळे रेल्वेचं जाळं ९०० किमीनं वाढणार आहे.

५१० गावांना जोडण्याची तयारी

या प्रकल्पांच्या माध्यमातून ६४ नवीन स्थानके उभारण्यात येणार असल्याचं सरकारनं म्हटलंय. यामुळे देशातील ५१० गावांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तर ४० लाख लोकसंख्येवर थेट परिणाम होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७६७ कोटी किलो कार्बनची बचत होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता

सरकारच्या या घोषणेचा फायदा रेल्वे विकास निगम (RVNL Share), टिटागड रेल सिस्टीम्स, आयआरएफसी (IRFC Share), ज्युपिटर वॅगन्स, बीईएमएल लिमिटेड या कंपन्यांना येत्या काळात मिळू शकतो. सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानामुळे रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांना अनेक प्रकल्प मिळाले आहेत. ज्यामुळे शेअर बाजारात या कंपन्यांची स्थिती पूर्वीपेक्षा बरीच चांगली झाली आहे. गेल्या वर्षभरात रेल विकास निगमसह रेल्वेच्या अनेक शेअर्सनीही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेल्वेशेअर बाजार