बाजार नियामक सेबीनं (SEBI) आयपीओशी (IPO) संबंधित नियम बदलले आहेत. या अंतर्गत सेबीनं लिस्टिंग टाइमलाइन कमी केली आहे. सेबीनं बुधवारी जाहीर केलं की त्यांनी आयपीओ लिस्टिंगचे मुदत सध्याच्या T+6 दिवसांवरून T+3 दिवसांवर आणली आहे. डिसेंबर २०२३ पासून लागू होणार्या नवीन नियमांनुसार, इश्यू बंद होण्याच्या तारखेपासून ३ दिवसांनी आयपीओ लिस्ट करणं अनिवार्य होणार आहे. सेबीचं हे पाऊल गुंतवणूकदार आणि पब्लिक इश्यू जारी करणाऱ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी महत्त्वाचं आहे.
सेबीनं यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. १ सप्टेंबर किंवा त्यानंतर येणाऱ्या सर्व पब्लिक इश्यूंसाठी लिस्टिंगची नवी मुदत ऐच्छिक असेल, तर १ डिसेंबरनंतर येणाऱ्या पब्लिक इश्यूंसाठी ती अनिवार्य असेल. लिस्टिंग आणि ट्रेडिंग टाइमलाइन कमी केल्यानं इश्यू जारी करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना फायदा होईल.
"पब्लिक इश्यू बंद झाल्यानंतर सिक्युरिटीजच्या लिस्टिंगसाठी लागणारा वेळ ६ कामकाजाच्या दिवसांपासून (T+6 दिवस) तीन कामकाजाच्या दिवसांवर (T+3 दिवस) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असं सेबीनं म्हटलंय.
कसा होईल फायदा?सेबीच्या या निर्णयामुळे इश्यू जारी करणार्यांना भांडवल लवकर उभारता येणार आहे. यामुळे व्यवसाय करणंही सोपं होईल आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम आणि रोख लवकर मिळण्याची संधी देखील मिळेल. नियामकानं म्हटलंय आहे की ASBA (अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) अर्जाच्या रकमेच्या विलंबासाठी गुंतवणूकदारांना भरपाई T+3 दिवसांपासून मोजली जाईल. सेबीच्या संचालक मंडळानं जूनमध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.