Mazagon Dock Shipbuilders Stock Price: गेल्या काही काळापासून सरकार अनेक कंपन्या आणि बँकांमधील आपला हिस्सा कमी करण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, आता माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders) या सरकारी कंपनीतील हिस्सा कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यासाठी सरकारकडून फ्लोअर प्राइस जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीतील एकूण ४.८३ टक्के हिस्सा विकला जाईल, असं सरकारनं म्हटलंय. ज्यासाठी कंपनीने फ्लोअर प्राइस २५२५ रुपये प्रति शेअर निश्चित केलीये.
शेअर्स घसरले
सरकारचा हा निर्णय गुंतवणूकदारांना आवडलेला दिसत नाही. ज्यामुळे शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर कंपनीचा शेअर २५७१.४० रुपयांच्या पातळीवर उघडला. दिवसभरात कंपनीच्या शेअरचा भाव २५५८.७५ रुपये (सकाळी ९.४५ वाजेपर्यंत) खाली आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे (MDL) शेअर्स ६ टक्क्यांनी घसरले.
दीपमचे सचिन अरुणीश चावला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ३ एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर केली. "माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची ऑफर फॉर सेल नॉन-रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुली होईल. तर किरकोळ गुंतवणूकदारांना सोमवारी त्यात गुंतवणूक करता येणार आहे. २.८३ टक्के हिस्सा सरकार कडून कमी केला जात आहे. तर ग्रीन शू पर्यायासाठी २ टक्के अतिरिक्त हिस्सा आहे,” असं त्यांनी नमूद केलंय.
सरकारकडून तब्बल १.१४ कोटी शेअर्सची विक्री केली जात आहे. या विक्रीच्या माध्यमातून सरकार ५००० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
शेअर बाजाराची कामगिरी कशी?
गेल्या वर्षभरात बहुतांश कंपन्या शेअर बाजारात संघर्ष करत होत्या. तर त्याचबरोबर चांगला परतावा देण्यात हा शेअर यशस्वी ठरला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे शेअर्स १३३ टक्क्यांनी वधारलेत. तर ६ महिन्यांत २५ टक्के परतावा देण्यात हा शेअर यशस्वी ठरला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)