Join us  

ऐन मोक्याच्या क्षणी Groww App बंद पडले; शेअर बाजारात एवढी बूम..., करोडोंचे नुकसान झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:25 PM

सकाळपासूनच युजर्सना ग्रो अ‍ॅपवर लॉगिन करण्यात समस्या येत होती. युजर्स सुरुवातीला एकमेकांना विचारत होते.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे सोमवारी बंद ठेवण्यात आलेला शेअर बाजार आज उघडला आणि एलएँडटीसह अन्य कंपन्यांच्या शेअर्सनी कमालीची उसळी घेतली. परंतु याचा फायदा Groww अ‍ॅपवरून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना घेता आला नाही आणि त्यांनी आता आमची नुकसान भरपाई कोण देणार असा ठेका सोशल मीडियावर धरला आहे. 

ग्रो अ‍ॅपच्या युजर्सनी आजच्या शेअर बाजारातील चढउताराचा फायदा घेता आला नाही याबद्दल संताप व्यक्त केला आहे. सुमारे तासभर ग्रो अ‍ॅप बंद पडले होते. जर आमची नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही हे अ‍ॅप अनइन्स्टॉल करून टाकू अशा धमक्याही अनेकांनी दिल्या आहेत. ग्रोच्या टीमने अ‍ॅपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने असे झाल्याचे म्हटले आहे. ही समस्या दूर करण्याचे काम सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

सकाळपासूनच युजर्सना ग्रो अ‍ॅपवर लॉगिन करण्यात समस्या येत होती. युजर्स सुरुवातीला एकमेकांना विचारत होते. नंतर अनेकांना ही समस्या असल्याचे समजल्यानंतर त्यांनी याचा राग कंपनीवर काढण्यास सुरुवात केली होती. याचे अनेक मीम्सदेखील व्हायरल होत आहेत. 

इन्ट्रा डे बाजार सुरु होताच ग्रो अ‍ॅप बंद पडले. यामुळे या लोकांचा राग अनावर झाला होता. बाजार सुरु होताच असे कसे अ‍ॅप बंद पडू शकते असा सवाल अनेकांनी केला आहे. 66.28 लाखांहून अधिक युजर्सना लॉगिन आणि इतर समस्यांचा सामना करावा लागला. समस्येचे निराकरण झाल्यानंतर, ब्रोकर प्लॅटफॉर्मने समस्येचे निराकरण झाल्याचे कळविले आहे. तसेच गैरसोयीबद्दल क्षमस्व असा खेदही व्यक्त केला आहे. 

टॅग्स :शेअर बाजार