Join us  

दिवाळखोर झाली 'ही' पॉवर कंपनी, वृत्त येताच शेअर्स विकण्यासाठी घाई; ₹९ वर आली किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:02 AM

GVKPIL Share Price : कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. कंपनीच्या शेअरने मंगळवारी ५ टक्क्यांचा नीचांकी स्तर गाठला

जीव्हीके पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (GVKPIL Share) शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. जीव्हीकेपीआयएलच्या शेअरने मंगळवारी ५ टक्क्यांचा नीचांकी स्तर गाठला आणि ९.६४ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठी बातमी आहे. 

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (NCLT) हैदराबाद खंडपीठानं जीव्हीके पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (जीव्हीकेपीआयएल) दिवाळखोर घोषित केलं आहे. हे प्रकरण १८,००० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न करण्याशी संबंधित आहे. एनसीएलटीनं आयसीआयसीआय बँक आणि इतर काही बँकांना १८,००० कोटी रुपयांचे कर्ज (व्याजासह) न फेडल्याबद्दल कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रिया (सीआयआरपी) सुरू केली आहे. जीव्हीकेपीआयएल ही जीव्हीके (GVK) ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी आहे.

काय आहेत डिटेल्स?

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) हैदराबाद खंडपीठानं आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या नेतृत्वाखालील कर्जदारांच्या संघानं दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला. जीव्हीकेपीआयएलनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, हे कर्ज जीव्हीके कोल डेव्हलपर्स (सिंगापूर) प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलं होतं, ज्यासाठी जीव्हीकेपीआयएलनं हमी दिली होती. एनसीएलटी खंडपीठानं १२ जुलै रोजी हा आदेश दिला होता, जो सोमवारी जाहीर करण्यात आला. आयसीआयसीआय बँकेनं २०२२ मध्ये याचिका दाखल केली होती. एनसीएलटीनं आपल्या आदेशात सतीश कुमार गुप्ता यांची कंपनीचं व्यवस्थापन करण्यासाठी अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे.

आदेशानुसार, कॉर्पोरेट कर्जदारानं आपली देणी स्वीकारली आणि १३ जून २०२२ पर्यंत कर्जदारांना १.८४ अब्ज डॉलर्स देणं आवश्यक होतं. यामध्ये १.१३ अब्ज डॉलर्सची मूळ रक्कम, ७३.१५ कोटी डॉलर्सचं व्याज आणि १,४४,००० डॉलर्सच्या एजन्सी फीचा समावेश आहे.

शेअर्सची स्थिती काय?

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १७ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २.४२ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,५२२.३६ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात या शेअरनं २७० टक्के नफा दिला आहे. या दरम्यान त्याची किंमत २ रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली आहे. बीएसई आणि एनएसईने जीव्हीके पॉवरच्या सिक्युरिटीजला दीर्घकालीन एएसएम (अतिरिक्त देखरेख उपाय) फ्रेमवर्कअंतर्गत ठेवले आहे. 

शेअर्सच्या किमतीतील उच्च अस्थिरतेबद्दल गुंतवणूकदारांना सावध करण्यासाठी एक्सचेंज शेअर्सला अल्पकालीन किंवा दीर्घकालीन एएसएम फ्रेमवर्कमध्ये ठेवतात. जीव्हीके इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे, ज्याचं मुख्यालय हैदराबाद येथे आहे. एनर्जी, विमानतळ, हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, रिअल इस्टेट, फार्मास्युटिकल्स आणि तंत्रज्ञान यासह अनेक क्षेत्रांमध्ये कंपनी सक्रिय आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार