सेन्सेक्सने सलग पाच सत्रांमध्ये ५,५६१ अंकांची झेप घेतली असून, गुंतवणूकदारांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि व्यापक पातळीवरील खरेदीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सेन्सेक्सने सोमवारी ८५५ अंक झेपावत ७९,००० चा महत्त्वाचा टप्पा गाठला. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ३२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
सोमवारी सेन्सेक्स ८५५ अंकांच्या वाढीसह ७९,४०८ अंकांवर बंद झाला. एका टप्प्यावर सेन्सेक्स १,०८१ अंकांनी वाढला होता. निफ्टी २७३ अंकांनी वाढून २४,१२५ अंकांवर बंद झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी. कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल तसेच बँक, आयटी समभागांमध्ये चांगली खरेदी झाल्याने बाजारात तेजी आली.
बाजारात तेजी कशामुळे?
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ९० दिवसांच्या तात्पुरत्या टॅरिफ सवलतीमुळे भारत-अमेरिका दरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
- भारताप्रमाणे चीनला अमेरिकेने टॅरिफमध्ये सवलत दिलेली नाही. यामुळे भारतीय निर्यातदारांना अल्पकालीन स्पर्धात्मक लाभ
- मिळू शकतो.
- परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात खरेदी करत आहेत. १७ एप्रिल रोजी संस्थांनी ४,६६७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. मागील आठवड्यात त्यांनी १४,६७० कोटींचे शेअर्स खरेदी केले होते.
- आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांचे चौथ्या तिमाहीच्या मजबूत निकालामुळे बँकिंग क्षेत्रात सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
- कोणते शेअर्स वाढले?
- एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. बँकेचा एकत्रित निव्वळ नफा मार्च तिमाहीत सात टक्क्यांनी वाढून १८,८३५ कोटी रुपये झाल्याने शेअर्स वाढले.
- इन्फोसिसच्या शेअरमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीचा मार्च तिमाहीतील निव्वळ नफा ३.३ टक्क्यांनी वाढला आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सुमारे २ टक्क्यांनी मजबूत झाला. यामुळे बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसले.
- आशियातील इतर बाजारांत दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय एसएसई कंपोजिट वाढले. तर जपानचा निक्केई घसरला. हाँगकाँगचा बाजार बंद होता. अमेरिकेतील बाजार गुरुवारी घसरणीसह बंद झाले होते. अमेरिका शेअर बाजार ‘गुड फ्रायडे’मुळे शुक्रवारी बंद होते.