Join us

Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:58 PM

Manappuram Finance shares: कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आज शेअर १७ टक्क्यांनी घसरला.

Manappuram Finance shares: गोल्ड फायनान्स (Gold Finance) कंपनी मणप्पुरम फायनान्सचे शेअर्स शुक्रवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. मणप्पुरम फायनान्सचा शेअर (Manappuram Finance Share) आज १७ टक्क्यांनी घसरला आणि १४७.५० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचा शेअर आज ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. शेअर्सच्या या घसरणीमागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) कारवाई आहे. रिझर्व्ह बँकेनं आपली उपकंपनी आशीर्वाद मायक्रो फायनान्सला कर्ज वाटप करण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर मणप्पुरम फायनान्स (Manappuram Finance) लिमिटेडवरील ब्रोकरेजनं डाउनग्रेड रेटिंग आणि टार्गेट प्राइसमध्ये कमी केली आहे.

अधिक माहिती काय? (Why Manappuram Share Falling?)

बंगळुरू स्थित नवी फिनसर्व्ह लिमिटेड, नवी दिल्ली स्थित डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, कोलकात्यातील रोहन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि चेन्नई स्थित आशीर्वाद मायक्रो फायनान्स लिमिटेड या एनबीएफसींना रिझर्व्ह बँकेनं गुरुवारी कर्ज मंजूर करणे आणि वितरण थांबविण्याचे आदेश दिले. रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या फेअर प्रॅक्टिस कोडचं पालन या युनिट्सकडून होत नसल्याचंही निदर्शनास आले आहे.

ब्रोकरेजनं काय म्हटलंय? 

मॉर्गन स्टॅनलीनं मणप्पुरम फायनान्सच्या शेअरवरील टार्गेट १७० रुपयांपर्यंत कमी केलं आहे. जेफरीजने हा शेअर डाऊनग्रेड करत 'होल्ड' रेटिंग दिलंय. याशिवाय त्याची  टार्गेट प्राइस १६७ रुपयांपर्यंत खाली आणली. तर ब्रोकरेज फर्म सीएलएसएनं शेअरवरील आपलं 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवलंय, परंतु त्याची टार्गेट प्राईज २४० रुपयांवरून २०० रुपये केली आहे

मणप्पुरमच्या शेअरचं कव्हरेज करणाऱ्या १८ अॅनालिस्टपैकी १२ जणांनी अजूनही शेअरवर 'बाय' रेटिंग दिलं आहे, चार जणांनी 'होल्ड' रेटिंग दिलंय, तर दोन जणांनी शेअरवर विक्रीचा सल्ला दिलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक