Join us  

आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 7:07 PM

HDB financial services ipo : देशातील खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीची सहायक कंपनी  HDB financial services आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. भांडवल उभारणीसाठी बोर्डाकडून कंपनीला मंजुरी देण्यात आली आहे.

HDB Financial Services IPO : एचडीएफसी बँकेशी संबंधित असलेल्या HDB financial services ने ipo आणण्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर याबद्दल महत्त्वाची अपडेट कंपनीकडून देण्यात आली. आम्ही आयपीओ आणण्याबद्दल विचार करत असून, त्यासाठी 'बोर्ड ऑफ डायरेक्टर'ची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली. 

एचडीएफसी बँकेच्या एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसने आयपीओच्या माध्यमातून २५०० कोटी रुपये उभारण्याला परवानगी दिली आहे. शुक्रवारी याबद्दल माहिती देण्यात आली. 

HDB Financial Services : आयपीओबद्दल कंपनी काय दिली माहिती?

बँकेने सांगितले की, कंपनीच्या संचालक मंडळाची आज (२० सप्टेंबर) बैठक झाली. या बैठकीत इतर विषयांबरोबर शेअर होल्डर्सच्या मंजुरीनुसार १० रुपये प्रारंभिक किंमतीनुसार इक्विटी शेअरच्या आयपीओबद्दल चर्चा केली आणि त्याला मंजुरी दिली. 

यात २५०० कोटी रुपयांपर्यंत इक्विटी शेअर्सचा एक नवीन इश्यू आणि कंपनीच्या सध्याच्या पात्र शेअर होल्डर्सद्वारे इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. 

समभागधारकांची मंजुरी घ्यावी लागणार

संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर आयपीओसाठी कंपनीला समभागधारकांची मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे. शेअर बाजाराच्या शर्थी, परवानग्या आणि सेबीची मंजुरीनंतर हा आयपीओ येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हणजे HDB Financial Services IPO येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. सेबीच्या मंजुरीनंतर HDB Financial Services IPO शेअर मार्केट लिस्ट होईल. 

HDB मध्ये HDFC बँकेचा हिस्सा किती?

एचडीएफसी बँकेकडे HDB Financial Services चा ९४.६४ टक्के हिस्सा आहे. HDB Financial Services च्या फायनान्ससाठी ७८०००-८७००० कोटी रुपये भांडवल एचडीएफसीला अपेक्षित आहे. आयपीओच्या माध्यमातून बँक १०-१५ टक्के हिस्सा विकू शकते. त्यातून ७८००-८७०० कोटी रुपये उभारले जाऊ शकतात. त्यामुळे भांडवल स्थिती मजबूत होणे अपेक्षित आहे. 

आरबीआयच्या निर्णयानंतर घेण्यात आला निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये HDB Financial Services लिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काही गैर बँक वित्तीय कंपन्या स्टॉक एक्सजेंमध्ये लिस्ट होणे आवश्यक आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सची बंपर लिस्टिंग झाल्यानंतर आयपीओचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारएचडीएफसीबँकिंग क्षेत्र