HDFC Bank Share Price : देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीच्या शेअर्समध्ये आज मोठी तेजी दिसून आली. एनएसईवर एचडीएफसी बँकेच्या शेअरचा भाव १,८३७.४० रुपयांवर पोहोचला. मागील बंदच्या तुलनेत हे प्रमाण १.८ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप पुन्हा १४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आज २१.७ लाख शेअर्सची ब्लॉक डील झाली. ब्लॉक डीलचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. दुपारच्या सुमारास एचडीएफसीचा शेअर १.१६ टक्क्यांनी वधारून १८२५.६० रुपयांवर व्यवहार करत होता.
मात्र, एचडीएफसी बँकेच्या पूर्वीच्या बंद भावानुसार १,८०४.७० रुपयांच्या बंद किंमतीनुसार, ब्लॉक डीलचं एकूण मूल्य सुमारे ३९२ कोटी रुपये असेल. यापूर्वी २८ नोव्हेंबर रोजी एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप १४.०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं होतं, परंतु नंतर जोरदार नफावसुलीमुळे ते १४ लाख कोटी रुपयांच्या खाली घसरलं.
शेअरची किंमत का वाढली
एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये नुकतीच झालेली तेजीही नोव्हेंबरच्या अखेरीस लागू झालेल्या एमएससीआय रिबॅलन्सिंगमुळे झाली. एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये एचडीएफसी बँकेचे वेटेज ताज्या रिबॅलन्सिंगमध्ये वाढले आहे. यामुळे पॅसिव्ह इनफ्लोमध्ये सुमारे १.९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
एचडीएफसी बँकेची आर्थिक स्थिती
एचडीएफसी बँकेनं सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत एकल निव्वळ नफा ५.३ टक्क्यांनी वाढून १६,८२१ कोटी रुपये नोंदवला आहे. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढून २७,३९० कोटी रुपयांवरून ३०,११० कोटी रुपयांवर पोहोचलंय. एचडीएफसी बँकेची एकूण बॅलन्स शीट ३४,१६,३०० कोटी रुपयांवरून ३६,८८,१०० कोटी रुपयांवर पोहोचलेय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)