Share Market Update: नव्या आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी खूप चांगला ठरला आहे. आयटी, बँकिंग आणि एनर्जी शेअर्समधील मोठ्या खरेदीमुळे आज पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकी स्तरावर बंद झाले. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 760 अंकांच्या वाढीसह 73,327 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 203 अंकांच्या वाढीसह 22,097 वर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स 1600 अंकांनी तर निफ्टीमध्ये 450 अंकांची वाढ दिसून आली.
संपत्तीत 2.70 लाख कोटींची वाढ
बाजारातील मोठ्या प्रमाणातील खरेदीमुळे, बीएसई वर लिस्टेड शेअर्सच्या मार्केट कॅपनं 375 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक ओलांडला आहे आणि 376.14 लाख कोटी रुपयांची पातळी गाठली आहे. मागील सत्रात ती 373.44 लाख कोटी रुपये होती. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.७० लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं तर, इन्फोसिस, एचडीएफसी, गार्डन रीच शिप बिल्डर, आयआरसीटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, फेडरल बँक, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय कार्डच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली तर अॅक्सिस बँक, पतंजली फूड्स, टाटा मोटर्स, गरवारे टेक्निकल फायबर्स, मुथूट फायनान्स, बजाज फायनान्स आणि आशानिषा इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
सोमवारी इरेडा, एलआयसी, पेटीएम, साउथ इंडियन बँक, गेल इंडिया लिमिटेड, सर्वोटेक पॉवर, इंडियन ऑइल, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर केम बाँड केमिकल्स, बीसीएल इंडस्ट्रीज आणि वॉक हार्ट लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.