Join us

सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार विक्री, शेअर बजार ९०० अंकांनी आपटला; गुंतवणूकदारांचे १३ लाख कोटी बुडाले; आयटीसीमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 4:09 PM

बुधवारी बऱ्याच चढ-उतारानंतर बीएसई सेन्सेक्स 906 अंकांनी घसरला आणि 72762 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बुधवारी बऱ्याच चढ-उतारानंतर बीएसई सेन्सेक्स 906 अंकांनी घसरला आणि 72762 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 338 अंकांच्या घसरणीसह 21997 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभर शेअर बाजाराच्या कामकाजात अनेक चढ-उतार नोंदवले गेले आणि बीएसई सेन्सेक्समध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचं भांडवल 13 लाख कोटी रुपयांनी कमी झालं. शेअर बाजारातील घसरणीचं कारण म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये झालेली प्रचंड विक्री. 

बुधवारी स्मॉल कॅप निर्देशांक पाच टक्क्यांनी तर मिडकॅप निर्देशांक तीन टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाला. मायक्रो कॅप आणि एसएमई शेअर्सही पाच टक्क्यांनी घसरले. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये एक बबल तयार होत आहे, त्यामुळे काही दिवसांपासून स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये जोरदार विक्री सुरू आहे, असं वक्तव्य अनेक तज्ज्ञ आणि बाजार नियामक सेबीच्या चेअरपर्सनंनं केलं. 

शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही आयटीसीचे शेअर्स 4.29 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि कोटक बँकेचे शेअर्सही वाढले तर पॉवर ग्रिड, कोल इंडियाचे शेअर्स सात टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी एंटरप्रायझेस आणि एनटीपीसीमध्येही सुमारे 7 टक्क्याची घसरण दिसून आली. 

या शेअर्समध्ये तेजी / घसरण 

जर आपण शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोललो तर, आयटीसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, सिप्ला, बजाज फायनान्स आणि डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये कोल इंडिया लिमिटेड, पॉवर ग्रिड, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी. टाटा स्टील आणि ओएनजीसीच्या शेअर्सचा समावेश होता.

टॅग्स :शेअर बाजारसेबी