Join us  

Hero Motocorp Dividend Stocks: ७११ कोटींचा नफा! ३२५० टक्के लाभांश जाहीर करत कंपनी झाली ‘हिरो’; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 6:23 PM

Hero Motocorp Dividend Stocks: या कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला काही ब्रोकरेज हाऊसने दिल्याचे सांगितले जात आहे.

Hero Motocorp Dividend Stocks: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. हिंडेनबर्गचा अदानी समूहाबाबतचा अहवाल, जागतिक घडामोडी, मंदीचे सावट या सर्वांचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. मात्र, यातच काही कंपन्या दमदार कामगिरी करून दाखवत आहेत. यातच एका कंपनीने तब्बल ७११ कोटी रुपयांचा नफा नोंदवत गुंतवणूकदारांसाठी ३२५० टक्क्यांचा लाभांश जाहीर केला आहे. 

देशातील दुचाकी विक्रीमध्ये आघाडीची कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने नुकतेच आपले आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. यामध्ये भागधारकांना ३२५० टक्के म्हणजेच प्रति शेअर ६५ रुपये लाभांश घोषित केला. तसेच मजबूत निकाल आणि व्यवसायाच्या आधारावर ब्रोकरेज हाऊसेसनी शेअरच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज अहवालानुसार शेअर सध्याच्या पातळीपासून २५ टक्क्यांपर्यंत चांगला परतावा देऊ शकतो.

हिरो मोटोकॉर्पची डिसेंबर तिमाहीत उत्पन्नामध्ये १.९ टक्क्यांची वाढ

ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉर्पने डिसेंबर तिमाहीत उत्पन्नामध्ये १.९ टक्क्यांची वाढ नोंदवली, जी ७८८३ कोटी रुपयांवरून ८०३१ कोटी रुपयांपर्यंत वाढली. तसेच एबीटामध्ये ३.७ टक्क्यांची घट झाली. म्हणजेच ऑपरेटिंग नफा ९०६ कोटी रुपयांवरून ९२४.२ कोटी रुपयांवर घसरला. मार्जिन ०.७० टक्क्यांनी म्हणजेच १२.२ टक्क्यांवरून ११.५ टक्क्यांवर खाली आले आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा ६.३ टक्क्यांनी वाढून ६८६ कोटींवरून ७११ कोटी झाला आहे.

दरम्यान, हिरो मोटोकॉर्पने आर्थिक वर्ष २०२३ साठी अंतरिम लाभांश जाहीर केला. यापूर्वी कंपनीने जुलै २०२२ मध्ये प्रति शेअर ३५ रुपये अंतिम लाभांश दिला होता. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत कंपनीने प्रति शेअर १०० रुपये लाभांश जाहीर केला आहे. कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये कंपनीने दोन लाभांश जारी केले होते. पहिला लाभांश फेब्रुवारी २०२२ मध्ये जारी करण्यात आला. त्यावेळी कंपनीने ६० अंतरिम लाभांश जाहीर केला होता.

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :हिरो मोटो कॉर्पशेअर बाजारगुंतवणूक