Join us  

Hero Motocorp Share Price : 'या' बाईक कंपनीच्या शेअरनं पकडला तुफान स्पीड, गुंतवणूकदारांच्या उड्या; बनवला रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 4:33 PM

Hero MotoCorp shares: बुधवारी बाजारानं यू-टर्न घेतला आणि पुन्हा एकदा सेन्सेक्स-निफ्टी रिकव्हरीच्या ट्रॅकवर धावला. दरम्यान, वाहन क्षेत्रातील शेअर्समध्येही यावेळी मोठी खरेदी दिसून आली.

Hero MotoCorp shares: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात भूकंप झाला. या वातावरणामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बुधवारी बाजारानं यू-टर्न घेतला आणि पुन्हा एकदा सेन्सेक्स-निफ्टी रिकव्हरीच्या ट्रॅकवर धावला. दरम्यान, वाहन क्षेत्रातील शेअर्समध्येही यावेळी मोठी खरेदी दिसून आली. 

शेअर्स खरेदीसाठी उड्या 

दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प लिमिटेडचा शेअर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी ८.७ टक्क्यांनी वधारून ५,७७५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे. त्यानंतर कामकाजाच्या अखेरिस हा शेअर ५६२५ रुपयांवर बंद झाला. हीरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये जूनमध्ये आतापर्यंत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे महिन्यात हा शेअर १२.६ टक्क्यांनी वधारला. या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात या शेअरमध्ये ४ टक्क्यांची घसरण झाली होती. 

या शेअरने वर्ष २०२४ मध्ये ३८ टक्के सकारात्मक परतावा दिला आहे. हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा (५८ टक्के परतावा) आणि बजाज ऑटो (४० टक्के परतावा) हे निफ्टी ५० निर्देशांकातील तीन सर्वोत्तम कामगिरी करणारे शेअर्स आहेत. 

काय म्हणतात तज्ज्ञ? 

ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनच्या मते, नवं सरकार ग्रामीण समस्यांना कसं सामोरं जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ग्रामीण वापरातील वाढ किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील पुनरुज्जीवन हे हीरो आणि बजाज ऑटोसारख्या दुचाकी उत्पादकांसाठी सामान्यत: फायदेशीर आहे. अशा तऱ्हेनं त्यांच्या एन्ट्री लेव्हल बाईकची विक्री वाढण्याची शक्यता आहे. 

कंपनीचे तिमाही निकाल 

गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत हीरो मोटोकॉर्पचा नफा १६.७ टक्क्यांनी वाढून ९४३.४६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या (जानेवारी ते मार्च) तिमाहीत कंपनीचा नफा ८१०.८० कोटी रुपये होता. या तिमाहीत कामकाजातून मिळणारं उत्पन्न ९,६१६.६८ कोटी रुपये झालं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ८,४३४.२८ कोटी रुपये होतं. 

(टीप: यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :हिरो मोटो कॉर्पशेअर बाजार