Join us  

Hindenburg Research: शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, ज्याद्वारे हिंडेनबर्गची होते कमाई? बाजारासाठी का आहे धोकादायक? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:02 PM

Hindenburg Research Short Selling: हिंडेनबर्गनं आधी अदानी समूह आणि आता सेबी प्रमुखांविरोधात प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर सर्वत्र एका शब्दाची चर्चा सुरू आहे. तो शब्द म्हणजे शॉर्ट सेलिंग. खरं तर अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च एका लिस्टेड कंपनीविरोधात वादग्रस्त अहवाल जारी करते आणि यामाध्यमातून त्यांची मोठी कमाई होते.

Hindenburg Research: हिंडेनबर्गनं आधी अदानी समूह आणि आता सेबी प्रमुखांविरोधात प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर सर्वत्र एका शब्दाची चर्चा सुरू आहे. तो शब्द म्हणजे शॉर्ट सेलिंग (Short Selling). खरं तर अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च एका लिस्टेड कंपनीविरोधात वादग्रस्त अहवाल जारी करते आणि यामाध्यमातून त्यांची मोठी कमाई होते. ती आधी टार्गेट कंपनीचे शेअर्स शॉर्ट करते आणि त्यानंतर तिचा रिपोर्ट टार्गेट कंपनीच्या विरोधात येतो.

जाणून घेऊया शेअर्सचं हे शॉर्ट सेलिंग म्हणजे नक्की काय आणि हिंडेनबर्ग रिसर्चसारख्या गुंतवणूकदारांची त्यातून कशी कमाई होते? ज्या शॉर्ट सेलिंगमधून हिंडेनबर्ग रिसर्चसारख्या कंपन्या लिस्टेड कंपनीवर चिखलफेक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्यातून किती कमाई होते? तसंच शॉर्ट सेलिंगमधून कमाई करण्याचा मार्ग एकूणच बाजारासाठी धोकादायक का मानला जातो? हे आपण जाणून घेऊ.

गेल्या वर्षी चर्चेत आलेलं नाव

शॉर्ट सेलिंग ही काही नवी गोष्ट नाही. भारतात अनेकांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा शॉर्ट सेलिंगचं नाव ऐकलं असलं तरी हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानी समूहाविरोधात पहिल्यांदा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. शेअर्सच्या किमती चुकीच्या पद्धतीनं वाढविणे, शेल कंपन्यांचं जाळं तयार करणं आणि निनावी परदेशी फंडींगचं जाळं वापरून पैसे वळवणं असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. यानंतर अदानी समूहानं या आरोपांचं खंडन केलं होतं.

हिंडेनबर्गचं शॉर्ट सेलिंगशी कनेक्शन

एकीकडे गुंतवणूकदार कंगाल झाले, तर दुसरीकडे काहींनी मोठी कमाईदेखील केली. शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेबनर्गची कोट्यवधी डॉलर्सची कमाई झाली. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार गेल्या वर्षी अदानींच्या शेअर्सना शॉर्ट केल्यामुळे त्यांची ४ मिलियन डॉलर्सची कमाई झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी सेबी प्रमुखांवर आरोप केले आहेत. 

हिंडेनबर्गच्या याच कमाईबाबत बाजार नियामक सेबीनं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हिंडेनबर्ग यांनी या नोटिशीला अधिकृत उत्तर दिलं नाही, उलट सेबीवर हल्ला चढवला. हिंडेनबर्गनं ताज्या अहवालात सेबीप्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अदानी समूहाशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला आहे, परंतु सेबी प्रमुख आणि अदानी समूह या दोघांनीही त्याचं खंडन केलंय.

अशाप्रकारे शेअर्स शॉर्ट करतात

शेअर बाजारात गुंतवणूकदार भाव वाढला किंवा कमी झाला तरी दोन्ही तऱ्हेनं मोठी कमाई करतात. शॉर्ट सेलिंगबद्दल बोलायचं झालं तर शेअर बाजारात भाव घसरून कमाई करण्याचा हा एक मार्ग आहे. हे आपण एका उदाहरणानं समजून घेऊया. शॉर्ट सेलर प्रथम टार्गेट शेअरला शॉर्ट करतात. समजा एखाद्या शेअरची किंमत आता ५०० रुपये आहे, पण शॉर्ट सेलरला वाटतं की तो शेअर एका आठवड्यात ४०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. आता शॉर्ट सेलर ब्रोकरकडून त्या कंपनीचे १०० शेअर्स उधार घेऊन विकतो. आठवडाभरानंतर हा शेअर ४०० रुपयांपर्यंत घसरतो. आता तो खुल्या बाजारातून १०० शेअर्स विकत घेतो आणि ब्रोकरकडून घेतलेले शेअर्स परत करतो.

कशी होते कमाई?

अशा तऱ्हेनं शॉर्ट सेलर कंपनीनं प्रत्येक शेअरवर १०० रुपयांची कमाई केली. त्यांनी जे शेअर ५०० रुपयांवर उधार घेतले होते, ते परत करण्यासाठी त्यांना केवळ ४०० रुपये द्यावे लागले. म्हणजेच प्रत्येक शेअरवर १०० रुपयांचा नफा. अशाप्रकारे एका आठवड्यात त्यांनी १०० शेअर्सच्या लॉटवर १०००० रुपयांचा नफा मिळवला. हिंडेनबर्गनं अदानी समूहाच्या शेअर्सवर पहिल्यांना शॉर्ट पोझिशन घेतली आणि भाव पाडण्यासाठी वादग्रस्त रिपोर्ट सादर केला. हे पद्धत शेअर बाजारासाठी योग्य मानली जात नाही. कारण यामुळे शॉर्ट सेलरला जितका नफा होत नाही, त्यापेक्षा अधिक दुसऱ्या गुंतवणूकदारांना नुकसान होतं.

बाजारासाठी धोकादायक का?

अशा रणनीतीत जेव्हा गुंतवणूकदारांचे पैसे मोठ्या प्रमाणावर बुडतात, तेव्हा त्यांचा बाजाराशी मोहभंग होतो. एकदा मोठा तोटा झाला की अनेक गुंतवणूकदार पुन्हा बाजाराकडे वळू शकत नाहीत. कोणत्याही बाजारपेठेच्या वाढीसाठी ही सर्वात मोठी जोखीम असते की लोक त्यात गुंतवणूक करण्यास घाबरतात. अदानींच्या बाबतीत हिंडेनबर्गच्या अहवालातून समूहाच्या शेअर्सनं तोटा जवळजवळ भरून काढला असला तरी त्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. बऱ्याच प्रकरणांमध्ये, शॉर्टेड स्टॉक कधीही जुनी पातळीही गाठू शकत नाहीत.

टॅग्स :अदानीशेअर बाजारगुंतवणूक