नवी दिल्ली - हाँगकाँगला मागे टाक भारत जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इक्विटी मार्केट झाले आहे. आता केवळ अमेरिका, चीन आणि जपानच भारताच्या पुढे आहेत. भारतीय एक्सचेन्जसवर लिस्टेड शेअरचे एकत्रीत मूल्य 4.33 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. यांपैकी जवळपास दोन ट्रिलियन डॉलर भारतात गोल्या चार वर्षांत जोडले गेले आहेत.
याच बरोबर, आर्थिक सुधारणांमुळेही जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत. याच वेगाने भारताची घोडदौड सुरू राहिली तर चीन आणि जपान मागे पडू शकतात. मात्र अमेरिकेपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागेल. कारण अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल या दोन कंपन्यांचे मार्केट कॅपच भारतातील एकूण 5000 हून अधिक लिस्टेड कंपन्यांपेक्षा अधिक आहे.
अमेरिका जगातील सर्वात मोठे स्टॉक मार्केट आहे. याचे मूल्य 50.86 ट्रिलियन डॉलर एढे आहे. चीन 8.44 ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जपान 6.36 ट्रिलियनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकन कंपन्या मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप तीन ट्रिलियन डॉलर आहे तर अॅपलचे मार्केट कॅप 2.95 ट्रिलियन डॉलर एवढे आहे. या दोनच कंपन्यांचे मार्केट कॅप जवळपास सहा ट्रिलियन डॉलर एवढे आहे. जे भारताच्या एकूण इक्विटी मार्केटच्या तुलनेत अधिक आहे.
मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात व्हॅल्यूएबल कंपनी आहे. तर अॅपल दुसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण जगात केवळ सहा कंपन्यांचे मार्केट कॅप एक ट्रिलियन डॉलरहून अधिक आहे. यांत पाच कंपन्या एकट्या अमेरिकेच्या आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल शिवाय, अल्फाबेट, अॅमेझॉन आणि एनव्हीडिया या कंपन्यांचा यात समावेश आहे.
भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी कोणती? -भारतातील सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी म्हणजे, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही आहे. हिचे मार्केट कॅप 222 अब्ज डॉलर एवढे होते. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे टीसीएस (168 अब्ज डॉलर) तर एचडीएफसी बँकेचा (141 अब्ज डॉलर) तिसरा क्रमांक लागतो. जगातील टॉप कंपन्यांच्या यादीत रिलायन्स 48व्या, टीसीएस 71व्या, तर एचडीएफसी बँक 87व्या क्रमांकावर आहे.