- प्रसाद गो. जोशी
भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली असून अनुकूल वातावरणामुळे त्यांच्यातील वाढ आणखी होण्याची शक्यता असली तरी काही प्रमाणात बाजारावर विक्रीचे दडपण येणार असून त्यामुळे कुठेतरी या तेजीला ब्रेक लागण्याची शक्यताही काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. असे असले तरी शेअर बाजाराचे निर्देशांक या सप्ताहामध्ये अधिक उंची गाठण्याचीच शक्यता आहे.
अर्थव्यवस्थेमध्ये झालेली वाढ, पीएमआयमधील वृद्धी, अमेरिकेतील बॉण्डवर कमी झालेले व्याज, पुढील वर्षामध्ये व्याजदर वाढ थांबविण्याचे अमेरिकेचे संकेत या बाबींमुळे भारतीय शेअर बाजार उसळला आहे. त्यामध्ये खनिज तेलाचे दर कमी झाल्याने आणखी इंधन ओतले गेले. सेन्सेक्स, निफ्टी आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांनी नवनवीन उच्चांक गाठण्याची स्पर्धाच सुरू केली आहे. बाजारामध्ये असलेल्या तेजीचा फायदा नफा कमविण्यासाठी घेतला गेल्यास बाजारावर विक्रीचे दडपण येईल. मात्र त्यामुळे बाजारात होणारी घट ही तात्पुरती असून बाजार आणखी वाढण्याचीच शक्यता आहे.
गतसप्ताहामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने १६६८.१५ अंशांची वाढ देत हा निर्देशांक ७१,४८३.७५ अंशांवर पोहोचवला आहे.
परकीय वित्तसंस्थांची १८,८५८ कोटींची खरेदी
nगतसप्ताहामध्ये भारतीय बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांनी आक्रमक खरेदी केलेली दिसून आली. या संस्थांनी बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
nगतसप्ताहात संस्थांनी १८,८५८.३४ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चालू महिन्यातील या संस्थांची खरेदी २९,७३३.०६ कोटींवर पोहोचली आहे. बाजारातील तेजीचा वेळोवेळी विक्री करून देशांतर्गत वित्तसंस्था नफा कमविण्यासाठी उपयोग करीत असल्याचे दिसले.
nगतसप्ताहात या संस्थांनी २५९२.४५ कोटी रुपयांची विक्री केली. मात्र आतापर्यंतचा चालू महिन्याचा विचार करता देशांतर्गत वित्तसंस्थांनी ३१८२.२० कोटी रुपये बाजारात गुंतविले आहेत.