Join us  

Whiskey तयार करणाऱ्या कंपनीचं शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग, पाहा पहिल्याच दिवशी किती झाला फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 12:56 PM

Allied Blenders IPO : मद्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या आयपीओनं शेअर बाजारात चांगली सुरुवात केली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर १३ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३१८.१० रुपयांवर लिस्ट झाला.

Allied Blenders IPO : अलाइड ब्लेंडर्स या मद्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या आयपीओनं शेअर बाजारात चांगली सुरुवात केली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर १३ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३१८.१० रुपयांवर लिस्ट झाला. तर एनएसईवर कंपनीचे शेअर्स १४ टक्के प्रीमियमसह ३२० रुपयांवर लिस्ट झाले. मात्र, दमदार लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

प्राइस बँड किती होता?

बीएसईवर ३१९.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर कंपनीचा शेअर घसरला. बीएसईवर अलाइड ब्लेंडर्सचा शेअर १०.२५ मिनिटांनी ३१०.४० रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर शेअरमध्ये चढउतार दिसतच होता. आयपीओसाठी २६७ ते २८१ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता.

काय म्हणतात तज्ज्ञ?

कंपनीची लिस्टिंग प्री-लिस्टिंग चर्चेच्या अनुषंगानं झालेली नाही. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांना हा शेअर होल्ड करायचा आहे, त्यांनी इश्यू प्राईजवर आपला स्टॉप लॉस ठेवावा, असं स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडच्या वेल्थ हेड शिवानी नयती म्हणाल्या.

लॉट साईज काय होती?

आयपीओसाठी कंपनीनं एका लॉटमध्ये एकूण ५३ शेअर्स ठेवले होते. ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदाराला किमान १४,८९३ रुपये गुंतवावे लागणार होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरवर २६ रुपयांची सूट देण्यात आली होती. अलाइड ब्लेंडर्सचा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २५ जून ते २७ जून २०२४ पर्यंत खुला होता. कंपनीचा आयपीओ २४ जून रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. तेव्हा कंपनीने ४४९.१० कोटी रुपये उभे केले होते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक