Join us

IPO च्या किंमतीच्या खाली आला 'या' दिग्गज कंपनीचा शेअर; ब्रोकरेजनं दिला इशारा, 'आणखी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:06 IST

Hyundai Motor India shares Price: लिस्टिंगपासून या कंपनीचे शेअर्स सातत्यानं चर्चेत आहेत. डिस्काउंट लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही.

Hyundai Motor India shares Price: लिस्टिंगपासून ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे शेअर्स सातत्यानं चर्चेत आहेत. डिस्काउंट लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. गुरुवारी ह्युंदाई मोटर इंडियाचे शेअर्स त्यांच्या आयपीओ किमतीच्या खाली व्यवहार करत आहेत. आज इंट्राडे व्यवहारात कंपनीचा शेअर १ टक्क्यांनी वधारून १८९८.८५ रुपयांवर पोहोचला. आता ब्रोकरेज फर्म बोफा सिक्युरिटीजने या शेअरबाबत इशारा देत या शेअरवर कव्हरेज सुरू केलंय.

दक्षिण कोरियातील वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईची भारतीय शाखा ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे शेअर्स १.३३ टक्के डिस्काऊंटवर लिस्ट झाले. कंपनीनं आयपीओसाठी १९६० रुपये प्राईज बँड निश्चित केला होता. लिस्टिंग झाल्यापासून २२ ऑक्टोबरला कंपनीचा शेअर १,९६८.८० रुपयांवर पोहोचला आणि ही आत्तापर्यंतचा उच्चांकी पातळीदेखील आहे.

सविस्तर माहिती काय?

ब्रोकरेज फर्म बोफा सिक्युरिटीजनं ह्युंदाई मोटर इंडियावर 'अंडरपरफॉर्म' रेटिंग दिलंय. तसंच १,८४० रुपयांच्या टार्गेट प्राइससह कव्हरेज सुरू करण्यात आलं आहे. हे आजच्या शेअरच्या किमतीपेक्षा ३% पेक्षा अधिक घसरणीचे संकेत देतायत. ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटवर ह्युंदाईच्या मजबूत फ्रँचायझीवर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्याचा बाजारातील हिस्सा १४% आहे. 

कंपनीला त्याच्या मूळ कंपनीचा भक्कम पाठिंबा आहे आणि त्यांनी प्रीमियम तसंच एसयूव्ही सेगमेंटवर लक्ष केंद्रित केलंय. मात्र, बोफा सिक्युरिटीजने ह्युंदाई मोटर इंडियाबाबत इशारा दिला असून त्याची काही कारणेही सांगितली आहेत.

पहिलं कारण म्हणजे पॅसेंजर बाजारात मंदीचं वातावरण, विशेष करुन मेट्रो शहरांमध्ये. याशिवाय प्रीमियमायझेशन ट्रेंडमध्ये स्थैर्य आणि चालू क्षमतेशी संबंधित अडथळे. ब्रोकरेजने नवीन मॉडेल लाँच करणं आणि नजीकच्या काळात महत्त्वपूर्ण बाजार हिस्सा मिळविणं यासारख्या कमतरता देखील नोंदवल्या आहेत.

अन्य ब्रोकरेजची मतं काय?

गेल्या आठवड्यात मॉर्गन स्टॅनली आणि जेपी मॉर्गन या दोन परदेशी ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअरवर कव्हरेज सुरू केलं आणि दोघांनाही 'ओव्हरवेट' रेटिंग मिळाले. ह्युंदाई मोटर इंडियाबाबत १२ पैकी ९ ब्रोकरेजनं 'बाय'ची शिफारस आहे, तर तीन ब्रोकरेजनं 'सेल' रेटिंग आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचा २७८७०.१६ रुपयांचा आयपीओ होता आणि तो देशातील सर्वात मोठा आयपीओ होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकह्युंदाई