Hyundai Motor India : ह्युंदाई मोटर इंडियानं मंगळवारी आर्थिक वर्ष २०२४ च्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात १६ टक्क्यांची घट झाली आहे. यानंतर कंपनीचा निव्वळ नफा १,३७५ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १,६२८ कोटी रुपये होता.
आर्थिक अहवालानुसार, कंपनीचा ऑपरेटिंग महसूलही वार्षिक आधारावर ७ टक्क्यांनी घसरून १७,२६० कोटी रुपयांवर आला आहे. या तिमाहीत कंपनीनं २,२०५ कोटी रुपयांचा EBITDA (ऑपरेशनल प्रॉफिट) नोंदवलं आहे, जं गेल्या वर्षीच्या २,४४० कोटी रुपयांच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी आहे.
आयपीओला थंड प्रतिसाद
ह्युंदाई इंडियाचा आयपीओ हा आजवरचा सर्वात मोठा देशांतर्गत आयपीओ होता. पण त्याला बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ डिस्काऊंटेड प्राईजवर लिस्ट झाला असून सध्या त्याचे शेअर्स १,७२० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत, जे इश्यू प्राइसपेक्षा कमी आहे.
ह्युंदाई इंडियाने तिमाहीतील घसरणीला कमकुवत मार्केट सेंटिमेंट्स आणि भूराजकीय घटकांना जबाबदार धरलं आहे. दरम्यान, भविष्यात उद्योगात स्थिर मागणीची अपेक्षा आहे आणि वॉल्यूम, मार्केट शेअर आणि मार्जिनचा योग्य समतोल राखत गुणवत्ता कायम ठेवली जाईल असंही कंपनीनं म्हटलंय.
या तिमाहीत कंपनीनं एकूण १.९१ लाख युनिट्सची विक्री केली, त्यापैकी १.४९ लाख युनिट्स देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या. एसयूव्ही सेगमेंटनं देशांतर्गत बाजारपेठेत दमदार योगदान दिलं. तर कंपनीची निर्यात ४२,३०० युनिट्स होती.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)