Join us  

ICICI Securities Share: शेअर बाजारातून बाहेर होणार 'हा' बहुचर्चित शेअर, डिलिस्टिंगला मंजुरी; गुंतवणूकदारांचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 3:42 PM

ICICI Securities Share: एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने बुधवारी या शेअरचा शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा अर्ज मंजूर केला आणि अल्प भागधारकांचे आक्षेपही फेटाळून लावले

ICICI Securities Share: नॅशनल कंपनी लॉ अथॉरिटीच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने बुधवारी आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा अर्ज मंजूर केला आणि अल्प भागधारकांचे आक्षेपही फेटाळून लावले. या करारानुसार आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या (ISE) भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक १०० शेअर्समागे आयसीआयसीआय बँकेचे ६७ शेअर्स मिळतील. दरम्यान, आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा शेअर दिवसभरात ८ टक्क्यांनी घसरून ७९२.७५ रुपयांवर आला.

काय आहे माहिती?

अल्प भागधारक क्वांटम म्युच्युअल फंड आणि मनू ऋषी गुप्ता यांनी घेतलेले आक्षेपही न्यायालयानं फेटाळून लावले. क्वांटम म्युच्युअल फंडाकडे ०.०८ टक्के तर मनू ऋषी गुप्ता यांच्याकडे ०.००२ टक्के शेअर्स आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या या योजनेला त्यांनी विरोध केला. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या ९३.८ टक्के भागधारकांनी या योजनेला यापूर्वीच मंजुरी दिली. शेअर बाजारातून बाहेर पडल्यानंतर आयसीआयसीआय सिक्युरिटीज बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल. याला आयसीआयसीआय बँकेद्वारे प्रमोटेड आहेत.

सेबीला दिले ६९.८२ लाख

दरम्यान, आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं बुधवारी सांगितलं की, ६९.८२ लाख रुपये भरून नियामक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय नियामकाकडे (सेबी) प्रकरण सोडवलं आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या मर्चंट बँकिंग व्यवहारांची पुस्तके आणि रेकॉर्डची तपासणी करण्यासंदर्भात सेबीकडे सेटलमेंट अर्ज दाखल केला आहे. ही निरीक्षणं प्रामुख्याने मर्चंट बँकर म्हणून कंपनीनं अवलंबलेल्या योग्य तपासणी प्रक्रियेशी संबंधित होती.

कंपनीच्या माहितीनुसार, सेबीच्या कारणे दाखवा नोटीसमुळे उद्भवणारी मोठी कार्यवाही टाळण्यासाठी कंपनीनं वरील प्रकरणाच्या संदर्भात सेटलमेंट रेग्युलेशनअंतर्गत सेटलमेंटसाठी अर्ज सादर केला. पैसे भरल्यानंतर सेबीनं दिलेला २० ऑगस्ट २०२४ रोजीचा सेटलमेंट ऑर्डर त्याच दिवशी कंपनीला मिळाली.

टॅग्स :शेअर बाजारआयसीआयसीआय बँक