जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्त्वाची आहे. सिक्युरिटीज मार्केटमध्ये छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग वाढावा यासाठी सेबीनं बेसिक सर्व्हिस डिमॅट अकाऊंटची (BSDA) मर्यादा दोन लाखरुपयांवरून दहा लाख रुपये केली आहे. ही नवी मार्गदर्शक तत्त्वं १ सप्टेंबरपासून लागू होतील, असं सेबीनं एका परिपत्रकात म्हटलं आहे.
बेसिक सर्व्हिस डिमॅट खात्यात ठेवलेल्या सिक्युरिटीजच्या मूल्याची मर्यादा वाढवल्यास छोट्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास प्रोत्साहन मिळेल. छोटे पोर्टफोलिओ असलेल्या गुंतवणूकदारांवरील डीमॅट शुल्काचा बोजा कमी करण्यासाठी बाजार नियामक सेबीने २०१२ मध्ये बेसिक सर्व्हिस डीमॅट खात्याची सुविधा सुरू केली होती.
काय आहेत अटी?
जर एखाद्या व्यक्तीकडे एकमेव किंवा प्रथम धारक म्हणून एकच डिमॅट खातं असेल आणि सर्व ठेवीदारांच्या नावावर एकच खातं असेल. तो मूलभूत सेवेसह डीमॅट खात्यासाठी पात्र आहे. अट अशी आहे की, खात्यात ठेवलेल्या सिक्युरिटीजचं मूल्य कोणत्याही वेळी १० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं, असं सेबीनं म्हटलं.
काय होते आतापर्यंतचे नियम?
या बदलापूर्वी याच डिमॅट खात्यात बेसिक सर्व्हिस डीमॅट खात्यासाठी पात्र होण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या डेट सिक्युरिटीज आणि दोन लाख रुपयांपर्यंतच्या नॉन डेट सिक्युरिटीजला परवानगी होती. चार लाख रुपयांपर्यंतच्या पोर्टफोलिओ मूल्यासाठी बीडीएसएसाठी वार्षिक देखभाल शुल्क आकारले जाणार नाही, तर चार लाख रुपयांपेक्षा अधिक आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या पोर्टफोलिओ मूल्यासाठी १०० रुपये आकारले जातील, असंही सेबीनं सांगितलं.
पोर्टफोलिओचं मूल्य १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास बेसिक सर्व्हिस असलेलं डिमॅट खातं आपोआप नियमित डीमॅट खात्यात रूपांतरित केले पाहिजे. बेसिक सर्व्हिससह डीमॅट अकाऊंटला इलेक्ट्रॉनिक डिटेल्स मोफत देण्यात येणार असल्याचे नियामकानं म्हटलं. यासह २५ रुपये भरून फिजिकल अकाऊंट डिटेल्स मिळवता येणार आहेत.