Join us

Elcid Investments Share : २ दिवसांत ३४००० रूपयांनी घसरला ‘हा’ शेअर, नुकताच पोहोचला होता ३ लाखांपार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:13 PM

Elcid Investments Share Price : मंगळवारी बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २९८२५२.२५ रुपयांवर आला.

Elcid Investments Share Price : काही दिवसांपासून एका शेअरची चर्चा आहे आणि तो शेअर म्हणजे एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा. १५ दिवसांत ३ रुपये ते ३ लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा शेअर आता घसरत चालला आहे. मंगळवारी बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. एल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २९८२५२.२५ रुपयांवर आला. सोमवारी कंपनीच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांची घसरण झाली. एल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअरमध्ये दोन दिवसांत ३४१४७ रुपयांची घसरण झाली आहे. ८ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअरनं ३,३२,३९९.९५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ३.५३ रुपये आहे.

एका दिवसात ६६९२५३५ टक्क्यांची वाढ

एल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी एकाच दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ६६९२५३५% वाढ झाली. एकाच दिवसात कंपनीचा शेअर ३.५३ रुपयांवरून २,३६,२५० रुपयांवर पोहोचला. मुंबई शेअर बाजारात झालेल्या स्पेशल कॉल ऑक्शननंतर एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. या तेजीनंतर एल्सिड इन्व्हेस्टमेंट्स एमआरएफला मागे टाकत देशातील सर्वात महागडा शेअर ठरला.

२१ ऑक्टोबरला जारी झालेलं सर्क्युलर

शेअर बाजार नियामक सेबीनं शेअर बाजारांना बुक व्हॅल्यूच्या तुलनेत भरघोस सूट देणाऱ्या होल्डिंग कंपन्यांसाठी विशेष लिलाव सत्र आयोजित करण्यास सांगितलं होते. या माध्यमातून अशा कंपन्यांचं सध्याचं बाजारमूल्य आणि होल्डिंग कंपन्यांची बुक व्हॅल्यू यातील तफावत कमी करणं हा सेबीचा उद्देश होता. काही लिस्टेड इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्या अधूनमधून आणि त्यांच्या बुक व्हॅल्यूपेक्षा खूपच कमी किमतीत व्यवहार करत आहेत, त्याचप्रमाणे एल्सिडच्या काउंटरवर ट्रेडिंग व्हॉल्यूम क्वचितच दिसून आलं.

२०११ पासून या शेअरची किंमत केवळ ३ रुपये प्रति शेअर असूनही एल्सिडची बुक व्हॅल्यू ५,८५,२२५ रुपये होती. या प्रचंड सवलतीमुळे विद्यमान भागधारक विक्री करण्यास टाळाटाळ करीत आहेत, कारण यात २०११ पासून कोणतेही व्यवहार झाले नाहीत. विशेष सत्रामुळे एल्सिडच्या स्टॉकच्या किंमतीत बदल झाला आहे. यामुळेच यात तब्बल ६.७ मिलियनची वाढ झाली. ही आजवरची सर्वाधिक एका दिवसातली तेजी आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक