नवी दिल्ली: रविवार, १४ ऑगस्टची सकाळ ही देशासाठी अतिशय दुःखदायक ठरली. सुरुवातीला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाची दुःखद बातमी आली आणि यामागून लगेचच शेअर मार्केटमधील बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफेट मानले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे निधन झाल्याची बातमी आली. आणि अवघा देश हळहळल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केलेली त्यांची अखेरची इच्छा अवघ्या ४८ तासांत पूर्ण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला यांनी गेल्या आठवड्यात सिंगर इंडियामध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखली होती. या कंपनीने राकेश झुनझुनवाला यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर मार्केट बंद होते. यानंतर शेअर मार्केट उघडले तेव्हा राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक कंपनी रेअर एंटरप्रायझेसने सिंगर इंडियाचे १० टक्के शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले. ही बातमी येताच कंपनीच्या शेअरने २० टक्क्यांच्या वरच्या सर्किटपर्यंत पोहोचला. सिंगर इंडियाचा शेअर मागील सत्रात ५७.६५ रुपयांवर बंद झाला आणि तो आता ६९.१५ रुपयांवर पोहोचला.
बिग बुल यांचा शेवटचा गुंतवणुकीचा निर्णय
राकेश झुनझुनवाला ज्या शेअरमध्ये हात घातला त्या कंपनीचे नशीबच पालटले जायचे, असे सांगितले जायचे. सिंगर इंडियामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचा शेवटचा गुंतवणुकीचा निर्णय असल्याचे सांगितले जाते. पण, तो अमलात येण्यापूर्वीच राकेश झुनझुनवाला अचानक निधन झाले. सिंगर इंडिया सिलाई मशीन, अक्सेसरीज आणि होम अप्लायन्सेसच्या व्यवसायात आहे. या कंपनीचा निव्वळ नफा २४३ टक्क्यांनी वाढून ९६ लाख इतका झाला आहे. जो मागील वर्षीच्या तिमाहीत २८ लाख रुपये होता. या कालावधीत कंपनीची निव्वळ विक्री जवळपास ५० टक्क्यांनी वाढून १०९.५३ रुपये झाली आहे. १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत कंपांनीच्या शेअर मार्केटच्या किमतीत ४.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, मातीला जरी हात लावला तरी त्याचे सोने होईल, अशी राकेश झुनझुनवाला यांची ख्याती होती. त्यांना पाहूनच लोक ठरवायचे की कोणत्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे, कोणत्या स्टॉकमधून पैसे काढायचे. अवघ्या ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ते शेयर बाजारात उतरले आणि पुढे जे घडले ते एखाद्या परिकथेसारखेच होते. इतकेच नव्हे तर झुनझुनवाला यांचा जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.