Stock Market News: जागतिक बाजारातून जोरदार संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी आहे. एफएमसीजी, रियल्टी आणि मीडिया वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे.
एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप १.५३ लाख कोटी रुपयांनी वाढलंय. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.५३ लाख कोटी रुपयांची वाढ झालीये. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या १५७.०२ अंकांनी वाढून ८०,५८१.७० वर आणि निफ्टी ५० ५२.२५ अंकांनी वाढून २४,६२४.९० वर आहे. सोमवारी सेन्सेक्स ८०,४२५.६८ वर आणि निफ्टी २४,५७२.६५ वर बंद झाला होता.\
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.५३ लाख कोटींची वाढ
एक दिवसापूर्वी म्हणजे १९ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५४,३९,९६५.७३ कोटी रुपये होतं. आज २० ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,५५,९३,२७२.५७ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात १,५३,३०६.८४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे २३ शेअर्स ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समधील ३० लिस्डेड शेअर्सपैकी २३ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. टीसीएस, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेकमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर दुसरीकडे एअरटेल, आयटीसी आणि जेएसडब्ल्यूमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. टाटा मोटर्स, मारुती, अॅक्सिस बँक, रिलायन्स, एनटीपीसी, नेस्ले, एशियन पेन्ट्स, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.