नवी दिल्ली : भारतीय हवामान विभाग तसेच हवामानाक्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढचे तीन महिने कडक उन्हाळ्याचे असणार आहेत. देशात अनेक राज्यांमध्ये आतापासून उष्णतेच्या लाटा वाहत आहेत. यातून सुटका मिळवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर एसी, कूलर्स, पंखे आदींचा वापर करीत आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच एसी, कूलर्स, फ्रीज बनवणाऱ्या कंपन्या, वीज कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. विजेची मागणी या काळात २५० जीगाव्हॅटने वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे चांगलेच मालामाल होण्याची शक्यता आहे.
जाणकारांच्या मते या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आणखी काही दिवस कायम राहणार आहे. उष्णता वाढल्याने कोल्डड्रिंक्स, सोडा, आईसक्रीम कंपन्या तसेच डेअरी उत्पादने यांचीही मागणी जोरदार वाढली आहे.
लिंबूपाणी, उसाच्या रसाला मोठी मागणी
घशाला सतत कोरड पडल्याने लोक शीतपेयाच्या स्टॉलकडे वळत आहेत. अशा पेयांची विक्री करणारे स्टॉल्स जागोजाग दिसू लागले आहेत. सर्वसामान्यांची लिंबूपाणी व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. थंड पाणी, लिंबूसोडा आदींची मागणी वाढली आहे.
काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी,गाजर तसेच इतर फळांचा ज्युस पिण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. लहान मुलांसोबत मोठी माणसेही गाड्यांवर बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद लुटतात. उसाच्या रसाच्या दुकानांमधील गर्दी चांगलीच वाढली आहे.