लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी दिसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार भाजपाची पुन्हा सत्ता येण्याची शक्यता आहे. अशातच एल अँड टीवरील आयकर विभागाने केलेली कारवाई काही प्रमाणावर परिणाम करण्याची शक्यता आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीवर आयकर विभागाने 4.68 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. हा दंड खूप जरी नसला तरी उद्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.
आयकर विभागाने एलअँडटी हाइड्रोकार्बन इंजीनियरिंग लिमिटेड या आधीच्या कंपनीवर कर कार्यवाहीसंबंधी प्रकरणात 4,68,91,352 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपनीचे एप्रिल २०२१ मध्ये एल अँड टीमध्ये विलिनीकरण झाले होते. आता या दंडावर कंपनीने आपण अपिल दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
L&T ही भारतातील 27 अब्ज डॉलरची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) प्रकल्प, आयटी आदी क्षेत्रामध्ये या कंपनीचा मोठा पसारा आहे. लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये गेल्या काही काळापासून वाढ होत आहे. शुक्रवारी हा शेअर 43 अंकांनी वाढून बंद झाला होता. हा शेअर सध्या 3,678.50 च्या पातळीवर आहे. गेल्या एका महिन्यात हा साठा ५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 11 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. परंतु उद्या यामध्ये घट होण्याची शक्यता आहे.