Stock Market : शेअर बाजारात सोमवारी आलेल्या त्सुनामीने गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपयांचा लॉस झाला होता. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी मार्केटने चांगलं कमबॅक केलं. विशेषतः हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर शेअर बाजारानेही उसळी घेतली. सलग ६ दिवसांच्या विक्रीनंतर बाजाराला ब्रेक लागला. गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा खरेदीकडे मोर्चा वळवल्यामुळे बाजार तेजीने बंद झाला.
बँकिंग ऑटो शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स ५८४ अंकांच्या उसळीसह ८१,६३४ अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने पुन्हा एकदा २४० अंकांच्या उसळीसह २५००० अंकांचा टप्पा ओलांडला आणि २५,०१३ अंकांवर बंद झाला.
कोणत्या क्षेत्रात चढउतार?
आजच्या व्यवहारात मिडकॅप शेअर्समध्ये प्रचंड खरेदी दिसून आली. तर निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १२३५ अंकांच्या उसळीसह ५८,५३५ अंकांवर बंद झाला. स्मॉलकॅप शेअर्समध्येही चमक दिसून आली. निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक ३७४ अंकांच्या किंवा २.०५ टक्क्यांच्या वाढीसह १८,६१७ अंकांवर बंद झाला. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा एफएसीजी, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि तेल व वायू क्षेत्रातील शेअर्स मजबूत वाढीसह बंद झाले. केवळ धातू क्षेत्राच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
कोणत्या शेअर्सने खाल्ला भाव?
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १९ शेअर्स वाढीसह बंद झाले तर ११ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३६ वाढीसह तर १४ शेअर्स घसरणीसह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट्स ४.७६ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.४२ टक्के, रिलायन्स २.०१ टक्के, एचडीएफसी बँक १.९५ टक्के, एल अॅण्ड टी १.८३ टक्के, एसबीआय १.५९ टक्के, एनटीपीसी १.४२ टक्के वाढीसह बंद झाले. घसरणाऱ्या शेअर्समध्ये टाटा स्टील २.८९ टक्के, टायटन २.३७ टक्के, बजाज फिनसर्व्ह २.२७ टक्के, बजाज फायनान्स १.१२ टक्के, टाटा मोटर्स ०.८९ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटींची वाढ
शेअर बाजारात पुन्हा तेजी आल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप ४५९.७८ लाख कोटी रुपयांवर बंद झाले. त्यामुळे सुमारे ८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जी मागील सत्रात ४५१.९९ लाख कोटी रुपयांवर बंद झाली होती.