मुंबई - एकीकडे इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यातील युद्ध थांबत नसतानाच दुसरीकडे त्याचा फटका बसल्याने भारतीय शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी घसरणीसह उघडला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी गडगडला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २०० हून अधिक अंकांनी घसरला आणि १९००० च्या खाली पोहोचला. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची २० लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्ती बुडाली आहे.
७३५ अंकांनी सेन्सेक्स घसरला
आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स ७३५.०१ अंकासह जोरदार कोसळून ६३.३१४.०५ पातळीवर आला. एनएसई निफ्टी २३० अंकापर्यंत घसरली. मार्केटमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची परिस्थिती बिकट आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये १.८८ टक्के तर स्मॉलकॅपमध्ये २.५७ टक्के घसरण झाल्याचे दिसून येते.
सुरुवातीच्या व्यापारात सर्वाधिक घसरलेल्या शेअर्सबाबत बोलायचे तर, M&M, Tech Mahindra, Bajaj Finserv आणि Hindalco २.७५ टक्क्यांपर्यंत घसरून व्यवहार सुरू आहेत. Share Market मध्ये आलेल्या सुनामीनं गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे. मागील ६ दिवसांत गुंतवणूकदारांचे २० लाख कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. गुरुवारी झालेल्या घसरणीत गुंतवणूकदारांची संपत्ती ५ लाख कोटीहून अधिक घटली आहे.
शेअर बाजार कोसळण्यामागे कारणं काय?
यावेळी केवळ भारतीय शेअर बाजारातच नव्हे तर परदेशी शेअर बाजारालाही फटका बसला आहे. शेअर बाजारात आलेल्या भूकंपामुळे गुंतवणूकादारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या घसरणीमागील कारणे शोधायची झाली तर १ नव्हे तर अनेक आहेत. ज्यामुळे सध्या शेअर मार्केट कोसळले आहे.
पहिले कारण – इस्त्रायल-हमास युद्ध, या युद्धाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. त्यात मीडिल इस्टमधील अनेक देश चपाट्यात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याचा परिणाम बाजारावर पडला आहे.
दुसरे कारण – इस्त्रायल-हमास युद्धाचा मध्यपूर्वेकडील देशांवर परिणाम होतोय त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ९० डॉलर प्रति बॅरेल किंमत पार केली आहे. त्यात आणखी दर वाढण्याची शक्यता असल्याने मार्केटवर परिणाम होत आहे.
तिसरे कारण – मागील सप्टेंबर महिन्यात FPI ने नेट आधारावर १४७६८ कोटी रुपये भारतीय बाजारातून काढले. तर ऑक्टोबरमध्येही विक्री सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी १२००० कोटी रुपयांचे शेअर्स विक्री केले आहेत. हे परदेशी गुंतवणूकदार फायनान्स, पॉवर, एफएमसीजी आणि आयटी शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत.
चौथे कारण - अमेरिकेतील १० वर्षांचे बॉन्ड यील्ड १६ वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. याआधी २००७ मध्ये तो ५ टक्क्यांच्या पुढे गेला होता. त्याचा परिणाम अमेरिकेसह जगभरातील बाजारातील घसरणीच्या रूपातही दिसून येत आहे.
पाचवे कारण - अमेरिकेतील व्याजदरातील बदलांचा परिणाम भारतीय बाजारांवरही होतो. अशा परिस्थितीत अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह बँक (US FED) ची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. पॉलिसी दरात वाढ होण्याची शक्यता आहे.