Join us  

मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजाराचं कमबॅक; टाटा केमिकल्स, डीएलएफसह या शेअर्समध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:33 AM

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीला मोठी पडझड झाल्यानंतर बाजाराने चांगलं कमबॅक केलं आहे. आज अनेक क्षेत्रातील शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत.

Stock Market : आठवड्याच्या सुरुवातीला बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर बुधवारपासून बाजाराने चांगलं पुनरागमन केलंय. चांगल्या जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या गतीने उघडला आहे. अमेरिकन बाजार वाढीसह बंद होत असताना, आशियाई बाजारांमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. ज्यामुळे सेन्सेक्स सुमारे २५० अंकांच्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टी सुमारे ९० अंकांच्या वाढीसह उघडला आहे. बँकिंग, एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्सच्या वाढीमुळे निर्देशांकात वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही वाढ होऊन बाजाराची सुरुवात झाली.

सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १५ शेअर्स वाढीसह आणि १५ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये टाटा केमिकल्स ४.२४ टक्के, भेल २.७४ टक्के, ओबेरॉय रिॲल्टी २.४७ टक्के, डीएलएफ २.२० टक्के, नाल्को २.२९ टक्के, पॉलीकॅब २.२४ टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत. इंडियन हॉटेल्समध्ये २.६९ टक्के वाढ झाली आहे. घसरलेल्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस १.९७ टक्के, डिव्हिस लॅब ०.८० टक्के, सीमेन्स १.०१ टक्के, ट्रेंट ०.८० टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.

एफएमसीजी, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांतील शेअर्सची वाढ वेगाने होत आहे. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, एनर्जी, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेटचे शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.५५ टक्के, निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक ०.८० टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. निफ्टी बँक निर्देशांक १३१ अंकांच्या किंवा ०.२६ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारपेठेतील आशियाई बाजारांवर नजर टाकल्यास, जपानचा निक्केई ०.२५ टक्के, हँग सेंग ४.०६ टक्के, कोस्पी ०.४९ टक्के, शांघाय बाजार २.८७ टक्के वाढीसह व्यवहार करत आहे. आज बाजाराचे लक्ष बड्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असणार आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. याशिवाय टाटा इलेक्सी, इरेडाचे निकालही जाहीर केले जातील. याशिवाय आर्केड डेव्हलपर्स, आनंद राठी वेल्थ देखील निकाल जाहीर करतील.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकटाटा