Join us

जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण; एशियन पेन्ट्सचा शेअर आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:01 AM

Stock Market Opening On 11 November 2024:  खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरणीसह उघडला.

Stock Market Opening On 11 November 2024:  खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरणीसह उघडला. आशियाई देशांच्या बाजारपेठांमध्ये घसरण होत असतानाच दुसरीकडे भारतीय शेअर बाजारही घसरणीसह उघडला. गिफ्ट निफ्टीनं आधीच बाजार घसरणीसह उघडण्याचे संकेत दिले होते. सेन्सेक्स ४०० अंकांनी तर निफ्टी ११८ अंकांनी घसरला आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण होऊन ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे.

हे शेअर्स फोकसमध्ये 

कामकाजाच्या सुरुवातीला एशियन पेंट्सच्या शेअर्समध्येही बाजार उघडताच मोठी घसरण झाली. कंपनीच्या खराब तिमाही निकालांमुळे अनेक ब्रोकरेज हाऊसेसनं शेअरवरील टार्गेट प्राइस कमी केल्यानं एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये घसरण होत आहे. एशियन पेंट्सचे शेअर्स ९ टक्क्यांनी घसरले. सध्या हा शेअर ८.३४ टक्क्यांच्या घसरणीसह २५३९ रुपयांवर व्यवहार करत आहे. आजच्या सत्रात मारुतीचा शेअरही चर्चेचा विषय ठरला आहे. कंपनी आपल्या डिझायर वाहनाचं नवं मॉडेल लाँच करत आहे.

क्षेत्रीय अपडेट्स

आजच्या व्यवहारात बँकिंग, एफएमसीजी, एनर्जी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर, रिअल इस्टेट आणि मीडिया सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. तर ऑटो, आयटी, फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १२ शेअर्स वधारले असून १८ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टीचे ५० पैकी १४ शेअर्स वधारले असून ३६ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, एनटीपीसी या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

आशियातील प्रमुख बाजारांपैकी असलेल्यांपैकी निक्केई ०.३९ टक्के, स्ट्रेट्स टाइम्स ०.४७ टक्के, हँगसेंग २.३५ टक्के, तैवान ०.६८ टक्के, कोस्पी १.२७ टक्क्यांनी घसरण झाली. तर शांघायच्या बाजारातही घसरण होताना दिसत आहे.

टॅग्स :शेअर बाजार