Stock Market Opening Bell: अमेरिकन फेड सप्टेंबरमध्ये व्याजदरात कपात करेल, या आशेनं अमेरिकन आणि युरोपियन बाजारात तेजी दिसून आली. मात्र, आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. देशांतर्गत बाजारात तेजीचा कल दिसत असून इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्येही तेजी आहे. फार्मा वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप १.५६ लाख कोटी रुपयांनी वाढलंय, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.५६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या २५३.३७ अंकांनी वाढून ८१,१५८.६७ वर आणि निफ्टी ५० ७८.२० अंकांनी वाढून २४,८४८.४० वर आहे. यापूर्वी बुधवारी सेन्सेक्स ८०,९०५.३० वर आणि निफ्टी २४,७७०.२० वर बंद झाला होता.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.५६ लाख कोटींची वाढ
एक दिवसापूर्वी म्हणजे २१ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५९,२४,२३०.६७ कोटी रुपये होतं. आज २२ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६०,८०,५९०.८३ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात १,५६,३६०.१६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे २३ शेअर्स ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २३ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. इन्फोसिस, इंडसइंड बँक आणि टाटा स्टील यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर दुसरीकडे पॉवरग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. याशिवाय भारती एअरटेल, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय बँक, नेस्ले, एचडीएफसी बँक, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक, अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.