Join us  

Investment Tips: गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ ४ कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार; सेबीने दिली मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 2:09 PM

Investment Tips: एकीकडे शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असले, तरी विविध क्षेत्रातील कंपन्या IPO आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जाणून घ्या...

Investment Tips: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असे असले तरी एकामागून एक कंपन्या आपले IPO शेअर बाजारात सादर करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात विविध क्षेत्रातील चार कंपन्या आयपीओ सादर करणार असून, यासाठी आवश्यक असलेली परवानगी सेबीने दिल्याची माहिती देण्यात आली आहे. 

आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेबीने बिबा फॅशन लिमिटेड, कीस्टोन रिअल्टर्स, प्लाझा वायर्स आणि हेमानी इंडस्ट्रीज या चार कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (IPO) मान्यता दिली आहे. एथनिक वेअर फॅशन फर्म बीबा फॅशनने एप्रिलमध्ये आयपीओसाठी मसुद्याची कागदपत्रे दाखल केली होती. मसुद्याच्या कागदपत्रांनुसार आयपीओअंतर्गत ९० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच, प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून २.७७ कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील, असे सांगितले जात आहे. 

आयपीओद्वारे ८५० कोटी रुपये उभारणार

रुस्तमजी ग्रुपची कंपनी कीस्टोन रिअल्टर्सने जूनमध्ये आयपीओद्वारे ८५० कोटी रुपये उभारण्यासाठी मसुद्याची कागदपत्रे दाखल केली होती. कागदपत्रानुसार यामध्ये ७०० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रवर्तकांकडून १५० कोटी रुपयांचे शेअर्स विकले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच अॅग्रोकेमिकल निर्माता हेमानी इंडस्ट्रीज लिमिटेडने आयपीओद्वारे २ हजार कोटी रुपये उभारण्यासाठी मसुद्याची कागदपत्रे दाखल केली होती. या आयपीओअंतर्गत ५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, १,५०० कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रवर्तकांकडून विकले जाणार आहेत.

दरम्यान, यासह प्लाझा वायर्सने शेअर विक्रीसाठी मसुद्याची कागदपत्रे दाखल केली होती. दिल्लीस्थित कंपनी वायर, अॅल्युमिनियम केबल्स आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन, विपणन आणि विक्री या व्यवसायात कार्यरत आहे. कंपनी १,६४,५२,००० नवीन शेअर्स जारी करणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक