Join us  

रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल; एका आठवड्यात केली 29,634 कोटी रुपयांची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 1:46 PM

गेल्या आठवड्यात देशातील प्रमुख 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ झाली.

Mukesh Ambani Reliance : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) स्वतः श्रीमंत होण्यासोबतच सामान्य माणसालाही श्रीमंत करण्याचे काम करतात. त्यामुळेच गेल्या एका आठवड्यात त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये (Reliance Industries) गुंतवणूक करणाऱ्यांनी तब्बल 29,634 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या कंपनीने देशातील सर्वात मौल्यवान कंपनीच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. संपूर्ण आठवड्याच्या व्यवहारात किंचित वाढ नोंदवली गेली. त्यामुळेच देशातील प्रमुख 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांना सर्वाधिक फायदा झाला.

रिलायन्सने 29,634 कोटी रुपये कमावलेदेशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात एकूण 29,634.27 कोटी रुपयांनी वाढून 20,29,710.68 कोटी रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या बाजार भांडवलात वाढ होणे, म्हणजेच कंपनीच्या भागधारकांच्या संपत्तीत वाढ होणे. अशा प्रकारे, रिलायन्सच्या भागधारकांनी 29,634.27 कोटी रुपयांची कमाई आहे. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज अजूनही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

टॉप-10 कंपन्या पाहा...देशातील प्रमुख 10 मौल्यवान कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल गेल्या आठवड्यात 95,522.81 कोटी रुपयांनी वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर टीसीएसमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. कंपनीचे बाजार भांडवल रु. 17,167.83 कोटींनी वाढून रु. 16,15,114.27 कोटी झाले, तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल रु. 15,225.36 कोटींनी वाढून रु. 6,61,151.49 कोटी झाले.

याशिवाय, भारती एअरटेलचे बाजार भांडवल 12,268.39 कोटी रुपयांनी वाढून 8,57,392.26 कोटी रुपये, ICICI बँकेचे बाजार भांडवल 11,524.92 कोटी रुपयांनी वाढून 8,47,640.11 कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 28,949 कोटी रुपयांनी वाढले. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल 1,992.37 कोटी रुपयांनी वाढून 6,71,050.63 कोटी रुपये आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल 1,245.64 कोटी रुपयांनी वाढून 7,73,269.13 कोटी रुपये झाले.

(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.) 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सशेअर बाजारशेअर बाजार