M&M shares: महिंद्रा समूहाची आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअरमध्ये शुक्रवारी जोरदार वाढ झाली. मार्च तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. ट्रेडिंग दरम्यान शेअरचा भाव २५५७.९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ऑगस्ट २०२२ नंतर या शेअरमध्ये सर्वात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारच्या तेजीमुळे या शेअरनं २०२४ मध्ये ४५% पेक्षा जास्त परतावा दिला आहे आणि २०२४ मध्ये निफ्टी ५० वर आतापर्यंतचा सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर बनला आहे. गेल्या १२ महिन्यांत महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरनं जवळपास दुप्पट परतावा दिलाय.
ब्रोकरेज बुलिश
ऑटोमोबाइल आणि ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रावर कव्हरेज असलेल्या ४१ विश्लेषकांपैकी जवळपास ९० टक्के विश्लेषकांनी मार्च तिमाहीच्या निकालानंतर शेअरवरील 'बाय'ची शिफारस कायम ठेवली आहे. येत्या १२ महिन्यांत हा शेअर २९०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय.
कसे होते तिमाही निकाल
महिंद्रा अँड महिंद्रानं गुरुवारी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीचा महसूल आणि मार्जिन अपेक्षेपेक्षा जास्त होते. या कंपनीचा ऑटो सेगमेंट मजबूत होता, तर ट्रॅक्टर सेगमेंटवर दबाव होता.
कंपनीचे तिमाही निकाल
गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) महिंद्रा अँड महिंद्राचा निव्वळ नफा चार टक्क्यांनी वाढून २,७५४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २,६३७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. महिंद्रा अँड महिंद्रानं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत त्यांचा महसूल ९ टक्क्यांनी वाढून ३५,४५२ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत तो ३२,४५६ कोटी रुपये होता.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा २५ टक्क्यांनी वाढून ११,२६९ कोटी रुपये झालाय. महसूल १५ टक्क्यांनी वाढून १,३९,०७८ कोटी रुपये झाला. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळानं पाच रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक शेअरवर २१.१० रुपये लाभांश मंजूर केला आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)