Join us  

Azad Engineering: डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, मिळाली मोठी ऑर्डर, सचिनकडे आहेत ४ लाख शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:44 AM

Azad Engineering Share: एअरोस्पेस आणि डिफेन्स बिझनेसमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचीही गुंतवणूक आहे.

Azad Engineering Share: एअरोस्पेस आणि डिफेन्स बिझनेसमध्ये कार्यरत असलेल्या आझाद इंजिनीअरिंगचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. कंपनीचे समभाग इंट्राडे उच्चांकी पातळी १७७९.७५ रुपयांवर पोहोचले. शेअर्समधील या तेजीमागे मोठी ऑर्डर आहे. वास्तविक, कंपनीनं परदेशातून ऑर्डर मिळाल्याचं म्हटलं आहे. आझाद इंजिनीअरिंगला जर्मनीतील सिमेन्स एनर्जी ग्लोबल जीएमबीएच अँड कंपनी केजीकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे.

आझाद इंजिनीअरिंगला जर्मनीतील सिमेन्स एनर्जी ग्लोबल जीएमबीएच अँड कंपनी केजीकडून ५ वर्षांसाठी ऑर्डर मिळाली आहे. ही कंपनी गॅस आणि त्यांच्या ग्लोबल डिमांज्ससाठी महत्त्वपूर्ण रोटेशन कंपोनंट्सची निर्मिती आणि पुरवठा करते.

डिसेंबर २०२३ मध्ये आलेला IPO 

डिसेंबर २०२३ अखेर लिस्ट आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरची किंमत १९९% पेक्षा जास्त वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळालाय. विशेष म्हणजे आझाद इंजिनीअरिंगच्या शेअरची किंमत ५९४ रुपयांच्या आयपीओच्या किमतीपेक्षा ३ पटीनं वाढली आहे. शुक्रवारी एनएसईवर आझाद इंजिनीअरिंगच्या शेअरचा भाव 5 टक्क्यांनी वाढून १७७९.७५ रुपयांवर खुला झाला.

सचिन तेंडुलकरचीही गुंतवणूक

माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आझाद इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, सचिननं गेल्या वर्षी मार्च २०२३ मध्ये आझाद इंजिनीअरिंगमध्ये ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि या माध्यमातून त्याला कंपनीचे जवळपास ४ लाख इक्विटी शेअर्स मिळाले होते.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारपैसासचिन तेंडुलकर