Join us

Hyundai IPO कडे गुंतवणूकदारांची पाठ, पहिल्या दिवशी १८% सबस्क्राईब; काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:26 AM

Hyundai IPO Investment : ह्युंदाई इंडियाच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पाहा यावर काय म्हणताहेत एक्सपर्ट्स.

Hyundai IPO Investment : ह्युंदाई इंडियाच्या आयपीओला (Hyundai India IPO) गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी ह्युंदाईनं मंगळवारी आपला आयपीओ लाँच केला. हा आयपीओ २७,८७० कोटी रुपयांचा आहे. मात्र, पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचा थंड प्रतिसाद दिसून आला. पहिल्या दिवशी याला केवळ १८ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं.

कंपनीनं आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर १,८६५ ते १,९६० रुपयांचा प्राईज बँड निश्चित केला आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये ७ शेअर्स असणार आहेत. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असून यामध्ये ह्युंदाई इंडियाची पॅरेंट कंपनी ह्युंदाई मोटर ग्लोबल आपले १४.२ मिलियन शेअर्स विकत आहे.

म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून जमा होणारी संपूर्ण रक्कम पॅरेंट कंपनीकडे जाईल. मात्र, हा पैसा संशोधन आणि विकास तसंच नवीन नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी वापरण्यात येणार असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांचा अधिक प्रतिसाद

किरकोळ गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये सर्वाधिक रस दाखवला. त्यांचा हिस्सा २६ टक्के सबस्क्राईब झाला. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा १३ टक्के होता. त्याचवेळी, पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (क्यूआयबी) स्वतःसाठी राखीव असलेल्या शेअर्समध्ये केवळ ५% बोली लावली. अनलिस्टेड मार्केटमध्ये आयपीओ सुरू होण्यापूर्वी कंपनीचे शेअर्स २५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होते, जे आयपीओ प्राइस बँडच्या वरच्या पातळीपेक्षा सुमारे १.३% अधिक आहे.

काय म्हणाले एक्सपर्ट?

बहुतांश विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. भारतात कंपनीकडे मजबूत ब्रँड म्हणून पाहता येऊ शकतं . पॅसेंजर कार मार्केटमधील वाढीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी ही कंपनी सज्ज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अनुकूल उद्योग परिस्थिती, मजबूत आर्थिक स्थिती आणि एसयुव्ही श्रेणीदरम्यान त्याच्या वाढीची शक्यता स्थिर आहे. आम्हाला या आयपीओमधून लिस्टिंगवर मर्यादित नफ्याची अपेक्षा आहे. कंपनी मध्यम ते दीर्घ कालावधीत आपल्या पोर्टफोलिओवर चांगला दुहेरी आकडी परतावा देईल अशी अपेक्षा असल्याचं आयसीआयसीआय डायरेक्टनं म्हटलंय.

जर आम्ही त्याचा उच्चांकी प्राईज बँड पाहिला तर कंपनीचं मूल्य त्याचं आर्थिक वर्ष २०२४ च्या कमाईच्या २६.२ पट आहे. आपण आर्थिक वर्ष २०२५ च्या कमाईकडे आर्थिक आधारावर पाहिलं तर ते २६.७ टक्के आहे. आम्ही लाँग टर्म सबस्क्राईबचं रेटिंग दिलं आहे, अशी प्रतिकरिया आनंद राठी यांनी दिली.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ह्युंदाईइनिशिअल पब्लिक ऑफरिंग