IREDA Share: इरेडा (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट) गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीनं आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून तिमाही निकाल जबरदस्त राहिले आहेत. कंपनीनं एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत एकूण ३८३.६९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. हा मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ३०.२५ टक्के अधिक आहे. निव्वळ नफ्यात वाढ होण्यामागचं कारण म्हणजे महसुलात झालेली वाढ.
१२ दिवसांत केली घोषणा
इरेडानं पहिल्या तिमाहीत ३८३.६९ कोटी रुपयांचा नफा (पीएटी) कमावला आहे. ज्यात वार्षिक आधारावर ३०.२५ टक्क्यांनी वाढ झालीये. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९४.५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तिमाही संपल्यानंतर १२ दिवसांच्या आत कंपनीने निकाल जाहीर केले आहेत. बँकिंग आणि एनबीएफसी क्षेत्रात तिमाही निकाल जाहीर करणारी इरेडा ही पहिली कंपनी ठरली आहे.
एनपीएमध्ये घसरण
कंपनीने नेट नेम परफॉर्मिंग अॅसेटमध्येही कपात केली आहे. जून तिमाहीत कंपनीचा एनपीए ०.९५ टक्के होता. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो १.६१ टक्के होता. ३० जून २०२४ रोजी कंपनीची नेटवर्थ वाढून ९११०.१९ कोटी रुपये झाली. तर ३० जून २०२३ रोजी नेटवर्थ ६२९०.४० कोटी रुपये होती. म्हणजेच वार्षिक आधारावर निव्वळ संपत्तीत ४४.८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अधिक कर्जाचं वाटप
पहिल्या तिमाहीत इरेडाचं उत्पन्न १५०१.७१ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल ११४३.५० कोटी रुपये होता. कंपनीने जून तिमाहीत ९२१०.२२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. जे गेल्या वर्षी केवळ १८९२.४५ कोटी रुपये होते. इरेडाच्या गुंतवणूकदारांची सध्या चांदी झाली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरनं पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला. शुक्रवारी बीएसईमध्ये कंपनीचा दिवसभरातील उच्चांक ३०४.६० रुपये होता. बाजार बंद होताना कंपनीचा शेअर २८४.६५ रुपयांवर आला.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)